आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक नष्ट होईल; समुद्रात किंवा जमिनीवर कोसळू शकतं, रशियाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 07:59 AM2022-03-13T07:59:24+5:302022-03-13T07:59:32+5:30

पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांमुळे अवकाश उपकरणांत बिघाड होणार?

The International Space Station will be destroyed; Russia's warning | आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक नष्ट होईल; समुद्रात किंवा जमिनीवर कोसळू शकतं, रशियाचा इशारा

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक नष्ट होईल; समुद्रात किंवा जमिनीवर कोसळू शकतं, रशियाचा इशारा

Next

कीव्ह : कीव्ह शहरावर कब्जा करण्याकडे आता रशियाच्या लष्कराने सारे लक्ष केंद्रित केले आहे. पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे रशियाच्या प्रणालीमध्ये अडथळे येऊन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक नष्ट होऊ शकते, असा इशारा रशियाने दिला आहे.
रशियाच्या अंतराळ संस्थेचे प्रमुख दिमित्री रोगोझिन यांनी सांगितले की, पाश्चिमात्य देशांनी घातलेल्या निर्बंधांमुळे रशियाच्या अवकाश उपकरणांमध्ये बिघाड होऊन त्याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर होईल. त्यामुळे हे अंतराळ स्थानक समुद्रात किंवा जमिनीवर कोसळू शकते.

पाश्चिमात्य देशांनी निर्बंध मागे घेतले पाहिजेत, अशी मागणी रोगोझिन यांनी केली. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असलेले अमेरिकी अंतराळवीर मार्क टी. वंदे हेई व रशियाचे दोन अंतराळवीर पुढील महिन्यात परतणार होते. मात्र पाश्चिमात्य देशांनी निर्बंध मागे न घेतल्यास या अंतराळवीरांवर आफत ओढविण्याची शक्यता आहे.

अंतराळ स्थानकाची वैशिष्ट्ये...

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे २० नोव्हेंबर १९९८ रोजी अवकाशात प्रक्षेपण हे स्थानक स्थापन व संचालित करण्यात नासा (अमेरिका), रॉसकॉसमॉस (रशिया), जॅक्सा (जपान), इएसए (युरोप), सीएसए (कॅनडा) या अंतराळ संशोधन संस्थांचा प्रमुख सहभाग.

चंद्र, मंगळ व अन्य ग्रहांवरील भविष्यातील संशोधन मोहिमा डोळ्यासमोर ठेवून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे काम सुरू या स्थानकात विविध देशांचे अंतराळवीर काही विशिष्ट मुदतीसाठी वास्तव्य करतात ॲस्ट्रोबायोलॉजी, खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, भौतिकशास्त्र अशा अनेक विषयांच्या अंगाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात संशोधन होते.

तिसरे महायुद्ध करण्याची इच्छा नाही

युक्रेन युद्धामुळे रशियाच्या शेजारी असलेल्या लॅटव्हिया, इस्टोनिया, लिथुआनिया, रोमानिया या देशांच्या सीमेवर अमेरिकेचे सुमारे १२ हजार सैनिक पाठविल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले. सैनिक पाठविले असले तरी अमेरिका युक्रेनच्या निमित्ताने तिसरे महायुद्ध करू इच्छित नाही, असेही ते म्हणाले. युक्रेनला १३.६ अब्ज डॉलरची आर्थिक व लष्करी मदत देण्याच्या विधेयकाला अमेरिकी सिनेटने मंजुरी दिली आहे.

युक्रेनवरील हवाई हल्ले वाढविले

रशियाने युक्रेनमधील शहरांवरील हवाई हल्ल्यांत शनिवारी आणखी वाढ केली. रशियाच्या लष्कराने मारियुपोल येथील एका मशिदीवर जोरदार गोळीबार केला. या मशिदीत सुमारे ८० लोक आहेत. कीव्ह शहर व त्याच्या परिसरात रशियन सैनिकांना युक्रेनकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. युक्रेनचे युद्ध लगेचच संपेल अशी रशियाची असलेली अटकळ चुकली आहे.

Web Title: The International Space Station will be destroyed; Russia's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.