शेख हसीना यांनी बांगलादेश सोडला तरी त्यांच्या पक्षाच्या अवामी लीगच्या नेत्यांना हिंसाचार करणारे आंदोलक शोधून शोधून मारत आहेत. यामुळे अनेक नेत्यांनी बांगलादेशबाहेर पलायन केले आहे, काहींना विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले आहे. अशातच बांगलादेश आर्मीच्या जनरलनी मोठी माहिती दिली आहे.
बांगलादेशचे सैन्य प्रमुख वकार उज-जमान यांनी हसीना यांच्या पक्षाच्या बड्या नेत्यांना आम्ही सुरक्षित ठेवले आहे, असे म्हटले आहे. या लोकांच्या जिवाला धोका आहे. यामुळे त्यांना संभाव्य हल्ल्यापासून वाचविण्यासाठी आम्ही सुरक्षित स्थळी ठेवल्याचे ते म्हणाले.
राजशाही कॅन्टोन्मेंट येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली. अशा लोकांना आश्रय देण्यात आला आहे ज्यांच्या जीवाला धोका आहे, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत किंवा कोणत्या धर्माचे असोत. यापैकी कोणावरही आरोप किंवा गुन्हा दाखल झाल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असेही उज-जमान यांनी स्पष्ट केले आहे. सध्या आमच्यासमोर त्यांची सुरक्षा महत्वाची आहे, असेही ते म्हणाले.
शेख हसीना सरकारमध्ये कायदा मंत्री असलेले अनिसुल हक आणि गुंतवणूक सल्लागार सलमान एफ रेहमान यांना ढाका येथून अटक करण्यात आली आहे. तर परराष्ट्र मंत्री हसन महमूद आणि हसिना सरकारमध्ये मंत्री असलेले जुनेद अहमद यांना विमानतळावरून भारतात येण्याच्या बेतात असताना ताब्यात घेण्यात आले होते. यापार्श्वभूमीवर सैन्य प्रमुखांचे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.
देशातील 20 जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याकांवर हल्ले झाल्याच्या 30 घटना घडल्या आहेत. आम्ही या प्रकरणांची चौकशी करत असून लवकरच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही परिस्थिती वेगळ्या प्रकारची आहे. प्रत्येकाला हे समजते, असे त्यांनी स्पष्ट केले.