कोरोनाचे संकट निवारून गेले आहे. चीनमधून सुरु झालेला हा व्हायरस हजारो लोकांचा बळी घेऊन शांत झाला आहे. भारतासह सर्वच लोकांनी लॉकडाऊन सुरु केला होता. परंतू, हा व्हायरस पसरण्यापासून काही रोखता आले नव्हते. लोकांनी सुरक्षित अंतर ठेवले, मास्क घातले, सॅनिटायझर वापरले, बरेच प्रयोग केले. रुग्णालयांतील बेड अपुरे पडत होते. औषधांचा तुटवडा जाणवत होता. डोलो सारख्या गोळ्या एवढ्या विकल्या गेल्या की एक विक्रम झाला होता. अशातच आता कोरोनामुळे सर्वाधिक दैना उडालेल्या अमेरिकेने आता कोरोना काळात केलेला लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता, असे म्हटले आहे.
सरकार बदलताच आता सरकारचे सूर बदलू लागले आहेत. चीनविरोधात अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी उघडली आहे. अशातच कोरोनाशी संबंधीत माहिती देणारी अधिकृत वेबसाईट कोविड डॉट गव्ह बदलण्यात आली आहे. या वेबसाईटवर जाताच एका नव्या वेबपेजवर रिडायरेक्ट केले जात आहे. या साईटवर आधी कोरोना लस, टेस्टिंग आणि उपचारासंबंधी माहिती दिली जात होती.
आता या वेबसाईटवर कोरोना व्हायरस चीनच्या लॅबमधून लीक झाला होता, असे येत आहे. कोरोनाच्या सुरुवातीला चीनच्या वुहान येथून कोरोना व्हायरस पसरल्याचे बोलले जात होते. तसेच एका लॅबमधून हा व्हायरस लीक झाल्याचा दावा करण्यात येत होता. चीनमधील एका संशोधक महिलेने हा दावा केला होता. यानंतर जगभरात खळबळ उडाली होती. बायोवॉरसाठी हे व्हायरस तयार केले जात होते, याद्वारे शत्रू देशात हाहाकार उडविला जाणार होता, असेही सांगितले जात होते. परंतू, आजवर या लॅब थेअरीबाबत शास्त्रियदृष्या कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही.
अमेरिकेतील कोरोनासंबंधीच्या सर्व वेबसाईट आता या चीनविरोधी विषय असलेल्या वेबसाईटवर वळविण्यात येत आहे. कोविड चाचणी किट ऑर्डर करता येणारी covidtests.gov ही वेबसाइट देखील तिकडेच वळविण्यात आली आहे. ट्रम्प आल्यापासून त्यांच्या अजेंड्यानुसार अनेक सरकारी वेबसाईटवरील मजकूर बदलण्यात आला आहे.