१०० दिवसांच्या युक्रेन-रशिया युद्धात उद्ध्वस्त झाला बाजार;जागतिक अर्थव्यवस्थांवर मंदीची छाया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 07:00 AM2022-06-04T07:00:17+5:302022-06-04T07:00:27+5:30

जागतिक अर्थव्यवस्थांवर मंदीची छाया; महागाई उच्चांकामुळे अन्नधान्याचे संकट

The market collapsed during the 100-day Ukraine-Russia war | १०० दिवसांच्या युक्रेन-रशिया युद्धात उद्ध्वस्त झाला बाजार;जागतिक अर्थव्यवस्थांवर मंदीची छाया

१०० दिवसांच्या युक्रेन-रशिया युद्धात उद्ध्वस्त झाला बाजार;जागतिक अर्थव्यवस्थांवर मंदीची छाया

Next

नवी दिल्ली : ज्या युद्धाला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केवळ ७२ तासांमध्ये संपवण्याची घोषणा केली होती, ते युद्ध आता १०० पेक्षा अधिक दिवस सुरू आहे. युद्धामुळे रशिया आणि युक्रेनचे मोठे नुकसान होत असून, त्यामध्ये अगोदरच कोरोनामुळे गर्भगळीत झालेल्या जगभरातील अर्थव्यवस्थांवरही संकटांचे काळे ढग दाटून आले आहेत. युक्रेन संकटांमुळे भारतासह जगभरातील महागाई नव्या उच्चांकावर पोहोचली असून, रुपयातही मोठी घसरण झाली आहे. त्याचा फटका देशाला बसतो आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे काळ्या समुद्रातून होणारा व्यापार पूर्णपणे ठप्प पडला आहे. गहू, तेलासह सर्वच वस्तूंचा पुरवठा थांबल्याने जगभरात अत्यावश्यक वस्तूंचा मोठा तुटवडा भासत आहे. यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. ४५ देशांमध्ये अन्नधान्य संकट निर्माण झाले आहे. फायदा कमावण्यासाठी जगभरातील गुंतवणूकदारांनी कृषी कमोडिटीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे, यामुळे अन्नपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. युक्रेन संकटामुळे भारतासह जगभरातील शेअर बाजारांमध्ये ७ ते १५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.

रुपयाची पत ढासळल्याने आयात महाग
युद्ध सुरू होण्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ७४ रुपयांच्या आसपास होता. मात्र, आता तो ७७.७ च्या स्तरापर्यंत खाली घसरला आहे. रुपया कमकुवत झाल्याने देशाच्या आयातीवर परिणाम होत असून, कच्चे तेल महाग झाले आहे.

जगभरात महागाई
युद्धामुळे जगभरात महागाई अनेक पटींनी वाढली आहे. भारत, अमेरिका, ब्रिटन व युरोपियन संघासह जगभरातील देशांमध्ये उच्चांकी स्तरावर महागाई आहे. एप्रिलमध्ये भारताचा वार्षिक महागाई दर ७.८ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात तेल, गहू, साखरेच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: The market collapsed during the 100-day Ukraine-Russia war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.