इस्लामाबाद: कॅनडानंतर आणखी एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याची पाकिस्तानात हत्या करण्यात आली होती. यामागे भारताचा हात असल्याचे बोलले जात होते. परंतू, या दहशतवाद्याचा कुटुंबातील जमिनीच्या वादावरून खून झाल्याचे समोर आले आहे.
शाहीद लतीफ हा २०१६ मध्ये झालेल्या पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. जैश ए मोहम्मदचा दहशतवादी लतीफला सियालकोटमध्ये गोळ्या झाडून ठार करण्यात आले. मोटरसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्याची हत्या केली होती. लतीफ हा भारतासाठी मोस्ट वाँटेड दहशतवादी होता.
बुधवारी पहाटे मोटरसायकलवरून आलेल्या लोकांनी लतीफ आणि त्याचा भाऊ हारिस हाशिम याच्यावर हल्ला केला. दस्का शहरातील नूर मदीना मशीदीबाहेर त्यांच्यावर हा हल्ला झाला होता. अंधाधुंद गोळीबारात लतीफचा मृत्यू झाला तर भाऊ जखमी झाला आहे. हे दोघे नमाजवरून बाहेर पडले होते.
सियालकोटचे डीपीओ हसन इक्बाल यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार लतीफचा मृत्यू हा वैयक्तिक वैरातून झाला आहे. कौटुंबीक वादातून ही हत्या झालेली आहे. जमिनीचा वाद सुरु होता, त्याच्या नातेवाईकांना पकडण्यात आले आहे, असे ते म्हणाले आहेत.
लतीफ उर्फ बिलाल उर्फ नूर अल दिन हा UAPA कायद्यांतर्गत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता. तो सियालकोटमध्ये जैशचा लाँचिंग कमांडर होता आणि भारतात दहशतवादाची योजना आखण्यात, मदत करण्यात आणि अंमलबजावणी करण्यात त्याचा सहभाग होता.