सिंगापूर : सिंगापूरमधील दोन भारतीय वंशाच्या मंत्र्यांनी पंतप्रधान ली सिन लूंग यांचे धाकटे भाऊ ली सिन यांग यांच्यावर त्यांनी दोन सरकारी बंगल्यांसाठी बाजारभावापेक्षा कमी भाडे दिल्याच्या आरोपावरून मानहानीचा दावा केला आहे. सिंगापूर न्यायालयाच्या वेबसाइटवर जारी करण्यात आलेल्या सुनावणीच्या यादीनुसार या प्रकरणी मंगळवारी (५ सप्टेंबर) सकाळी ९ वाजता सुनावणी होणार आहे.
कायदा आणि गृह व्यवहार मंत्री के. षणमुगम आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री विवियन बालकृष्णन यांनी जुलैमध्ये ली सिन यांग यांना नोटीस पाठवली होती. जर त्यांनी माफी मागितली नाही, आरोप मागे घेतले नाहीत आणि रिडआउट रोडवरील बंगल्यांच्या नुकसानीची भरपाई न केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे त्यात म्हटले होते.
षणमुगम यांनी म्हटले होते की, यांग यांनी त्यांच्यावर आणि बालकृष्णन यांच्यावर भ्रष्ट व्यवहार आणि वैयक्तिक फायद्यासाठी काम केल्याचा आरोप केला होता. ली सिन यांग आणि त्यांच्या पत्नीने जुलै २०२२ मध्ये एका पोलिस मुलाखतीला उपस्थित राहण्यास नकार दिल्यानंतर देश सोडला होता. ही मुलाखत त्यांचे दिवंगत वडील पंतप्रधान ली कुआन यू यांच्या न्यायालयीन कामकाजात खोटे बोलण्याशी संबंधित होती.