संपूर्ण जगाने रविवारी २०२२ ला निरोप देत २०२३ या वर्षात प्रवेश केला आहे. आज जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये ग्रेगोरियल कॅलेंडर पद्धतीने कालगणना केली जाते. तसेच व्यवहारात त्याचा वापर केला जातो. जगातील सुमारे २०० हून अधिक देशात सर्व व्यवहार हे ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार चालतात. विक्रम संवत पंचांगाची रचना करणाऱ्या भारतातही सरकारी कामकाजापासून ते इतर सर्व कामकाजामध्ये ग्रेगोरियन कॅलेंडरला प्राधान्य दिले जाते. मात्र या संपूर्ण जगात एकमेव देश असा आहे जिथे ग्रेगोरियन कॅलेंडरऐवजी हिंदू पंचांगानुसार कामकाज चालते. या देशाचं नाव आहे नेपाळ.नेपाळमध्ये सरकारी कामकाजापासून इतर सर्व ठिकाणी हिंदू पंचाग व्यवहारात वापरले जाते.
भारतातही अशा प्रकारचे स्वत:चे कॅलेंडर व्यवहारात आणण्याचा प्रयत्न झाला होता. १९५४ पासून तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या सरकारने हिंदू कॅलेंडर म्हणजेच विक्रम संवतला ग्रेगोरियन फॉरमॅटसह स्वीकारले होते. मात्र आज देशातीस सर्व कामकाज हे ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार चालते. नेपाळमध्ये मात्र पूर्वीपासून हिंदू कॅलेंडरचा वापर व्यवहारात होत आला आहे. याला विक्रमी कॅलेंडर म्हणूनही ओळखले जाते. हे कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा ५७ वर्षे पुढे आहे. या कॅलेंडरला विक्रम संवत कॅलेंडर असंही म्हणतात.
इसवी सनपूर्व ५७ पासूनच भारतीय उपखंडामध्ये तिथी आणि वेळेचे आकलन करण्यासाठी विक्रम संवत किंवा विक्रमी कॅलेंडरचा वापर होत आला आहे. हे हिंदू कॅलेंडर नेपाळचे अधिकृत कॅलेंडर आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये आणि ग्रामीण भागात या पंचांगाचा वापर होतो.
नेपाळमध्ये अधिकृतपणे विक्रम संवत कॅलेंडरचा वापर हा १९०१ पासून सुरू करण्यात आला. नेपाळच्या राणा वंशाने विक्रम संवतला अधिकृत हिंदू कॅलेंडर बनवले. नेपाळमध्ये नवं वर्ष हे वैशाख महिन्यातील पहिल्या दिवसापासून सुरू होते. तर चैत्र महिन्याच्या शेवटच्या दिवशी संपते. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सार्वजनिक सुट्टी दिली जाते.
विक्रम संवत पंचांगाचं नाव हे राज्या विक्रमादित्य याच्या नावावरून दिलं गेलं आहे. ज्यात संस्कृत शब्द संवतचा वापर हा वर्ष दर्शवण्यासाठी केला जातो. राजा विक्रमादित्यचा जन्म हा इसवीसन पूर्वी १०२ मध्ये झाला होता. तर त्याचा मृत्यू इसवी सन १५ मध्ये झाला होता.