युक्रेनमधील उत्तर भागात आता उडाला युद्धाचा भडका; डोनबासवर लक्ष केंद्रित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 08:43 AM2022-05-07T08:43:38+5:302022-05-07T08:44:08+5:30
मारियुपोलमधील बहुतांश सैन्य रशियाने हटविले
कीव्ह : मारियुपोल शहराच्या परिसरातील आपले बहुतांश सैन्य रशियाने तिथून हलविले आहे. या सैैन्याने आता युक्रेनच्या उत्तर भागाकडे कूच केले. मारियुपोलमध्ये आता रशियाचे फक्त २ हजार सैनिक असावेत, असे अमेरिकेच्या पेन्टॅगाॅनने म्हटले आहे. मारियुपोल तसेच स्टील प्रकल्पावर ‘व्हिक्टरी डे’च्या आधी कब्जा मिळविण्याचा रशियाचा विचार असल्याचे ब्रिटनने म्हटले आहे.
दुसऱ्या महायुद्धात रशियाने जर्मनीच्या नाझी फौजेवर ९ मे १९४५ रोजी विजय मिळविला. तेव्हापासून हा दिवस रशिया विजय दिन (व्हिक्टरी डे) म्हणून साजरा करतो. हा विजय दिन यंदा सोमवारी साजरा होणार असून त्याआधी रशियाला मारियुपोलवर संपूर्ण कब्जा करायचा असल्याची माहिती ब्रिटनच्या लष्कराला मिळाली आहे.
अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेन्टॅगाॅनने सांगितले की, मारियुपोल शहरावर रशियाने अद्यापही हवाई हल्ले सुरू ठेवले आहेत. मात्र तरीही हे शहर अद्याप त्यांना जिंकता आलेले नाही. आता डोनबास भागावर रशियाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. दरवर्षी विजय दिनानिमित्त माॅस्कोमधील लाल चौकात लष्करी संचलन होते. यंदा या दिनानिमित्त जनतेला उद्देशून भाषण करताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना आपल्या लष्कराचे यश जनतेला सांगायचे आहे. त्यासाठीच मारियुपोल हाती येणे त्यांना महत्त्वाचे वाटत आहे.
अमेरिकेच्या मदतीने मोस्कवा बुडविली
अमेरिकेच्या लष्कराने दिलेल्या गोपनीय माहितीमुळेच युक्रेनला रशियाच्या मोस्कवा या युद्धनौकेचा अचूक थांगपत्ता लागला. त्यानंतर युक्रेनने हल्ला करून ही युद्धनौका बुडविली असे अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. काळ्या समुद्रात रशियाच्या अण्वस्त्रवाहू युद्धनौका कोणत्या ठिकाणी उभ्या आहेत हेही अमेरिकेने युक्रेनला कळविले होते.
सल्ले देऊ नका, योग्य कृती कोणती ते आम्हाला कळते
संयुक्त राष्ट्रे : ‘आम्हाला सल्ले देऊ नका, कोणती कृती करायची हे आम्हाला नीट कळते’, या शब्दांत संयुक्त राष्ट्रांतील भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी टी. एस. तिरूमूर्ती यांनी नेदरलँडच्या ब्रिटनमधील राजदूताला खडसावले आहे. युक्रेन बाबत संयुक्त राष्ट्रांच्या आयोजिलेल्या आमसभेला भारताने उपस्थित राहावयास हवे होते, असे वक्तव्य नेदरलँडचे राजदूत करोल व्हॅन ओस्टेरॉम यांनी केले होते.
युक्रेन युद्ध विरोधात संयुक्त राष्ट्रांची आमसभा, सुरक्षा परिषद, मानवी हक्क समितीच्या बैठकीत ज्यावेळी ठरावावर मतदान झाले त्यावेळी भारत अनुपस्थित राहिला होता. त्यावर बोट ठेवत नेदरलँडचे राजदूत करोल व्हॅन ओस्टेरॉम यांनी तसे ट्विट केले होते.