बापूंनी दाखवलेला मानवतेचा मार्ग अनुसरला पाहिजे : नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 09:29 AM2024-08-24T09:29:33+5:302024-08-24T09:29:53+5:30
रशिया-युक्रेन युद्धावर सामंजस्याने तोडगा काढण्यावर पंतप्रधानांचा भर
कीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे युक्रेनच्या सात तासांच्या दौऱ्यावर शुक्रवारी आगमन झाले. त्यात त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच युक्रेन दौरा ठरला. दौऱ्यात त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहून ‘बापूंनी आपल्याला दाखवलेला मानवतेचा मार्ग आपण अनुसरला पाहिजे,’ असे मत व्यक्त केले.
पंतप्रधान मोदी ‘रेल फोर्स वन’ या विशेष रेल्वेने पोलंडहून १० तासांचा प्रवास करून युक्रेनची राजधानी कीवमध्ये दाखल झाले. येथील भारतीय नागरिकांनी मोदींचे जोरदार स्वागत केले. युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगाचे लक्ष लागलेला रशियाचा दौरा झाल्यानंतर सहा आठवड्यांनी मोदींनी युक्रेनचा हा दौरा केला.
पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशांतील युद्धाबाबत चिंता व्यक्त करून शांततामय मार्गाने प्रश्न सोडवण्याची भारताची अपेक्षा असल्याचे गुरुवारी पोलंड दौऱ्यात म्हटले होते. मोदी यांनी यापूर्वी जूनमध्ये जी-७ परिषदेच्या पार्श्वभूमीवर इटलीत झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली होती.
येथेच झाले होते ‘नाटो नाटो’चे चित्रीकरण
पंतप्रधान मोदी यांनी झेलेन्स्की यांचे निवासस्थान मारिस्की पॅलेस येथे द्विपक्षीय चर्चा केली. याच परिसरात तेलुगू ‘आरआरआर’ या चित्रपटाच्या ऑस्कर पुरस्कार विजेत्या ‘नाटो नाटो’ गाण्याचे चित्रीकरण झाले होते.
दौऱ्याचा मोठा परिणाम
मोदी यांचा दौरा युद्धग्रस्त युक्रेन आणि रशियामध्ये शांतता आणण्यात नक्कीच मोठी भूमिका बजावेल. त्यांच्या दौऱ्याचा परिणाम दिसेल, अशी अपेक्षा संयुक्त राष्ट्र सरचिटणीस अँटोनी गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी व्यक्त केली आहे.
६,०३,०१०
रशियन सैनिकांनी रशिया-युक्रेन युद्धात आपला जीव गमावला आहे.
८,५२२
रशियन रणगाडे, १६,५४२ चिलखती वाहने, १७,२१६ तोफखाने, ३६७ विमाने, ३२८ हेलिकॉप्टर्स, २८ जहाजे, १ पाणबुडी नष्ट करण्यात युक्रेनला यश.
४१,०००
पॅलेस्टिनी नागरिकांचा युद्धात मृत्यू.
९२,७४०
पेक्षा अधिक नागरिक युद्धात जखमी झाले आहेत.
१६,४००
लहान मुलांचा युद्ध सुरू झाल्यापासून मृत्यू झाला आहे.
१७,०००
पेक्षा अधिक मुलांनी आपले पालक गमावले आहेत. या मुलांना अन्नपाण्यासाठी रोज संघर्ष करावा लागत आहे.
भारत बनला विश्वमित्र...
नवी दिल्ली : २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यापासून त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या. त्यापैकी अनेक देशांना भारतीय पंतप्रधानांनी दिलेली भेट कित्येक दशकांनंतरची किंवा पहिलीच भेट ठरली. मोदींच्या दौऱ्यांचा हा आढावा.
२०२४ ४५ वर्षांनंतर पोलंड
२०२४ ४१ वर्षांनंतर ऑस्ट्रिया
२०१८ ३० वर्षांनंतर स्वीडन
२०१८ ३० वर्षांनंतर जॉर्डन
२०१६ ३४ वर्षांनंतर मोझांबिक
२०१५ ५० वर्षांनंतर आयर्लंड
२०१५ २८ वर्षांनंतर श्रीलंका
२०१४ ३४ वर्षांनंतर यूएई
२०१४ ३३ वर्षांनंतर फिजी