रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध दिवसागणित भीषण होत चालले आहे. या युद्धामध्ये दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होत आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन(Vladimir Putin) यांच्या आदेशानंतर रशियाच्या आण्विक प्रतिबंधक तुकड्या (Nuclear Deterrence Force) अलर्ट मोडवर आहेत. मागील काही दशकांपासून असं कधी घडलं नाही. ज्यात एका देशाने उघडपणे आण्विक हल्ल्याची धमकी दिली आहे. परंतु यूक्रेनवर हल्ल्या केल्यानंतर पुतिन यांनी हे बोलून दाखवलं आहे.
रशिया-यूक्रेन युद्धाचं अणुयुद्धात रुपांतर होऊ शकतं असे संकेत व्लादिमीर पुतिन यांनी दिले आहेत. त्यामुळे यूरोपात दहशत पसरल्याचं बोललं जात आहे. न्यूज एजेन्सी रॉयटर्सच्या प्रमाणे, पुतिन यांच्या धमकीनंतर विशेषत: मध्य युरोपात चिंतेची लाट आहे. त्याच वेळी, पोलँडपासून बेलारूस आणि पूर्व सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर तयार झालेल्या स्वतंत्र देशांपर्यंत या लढाईची भीती आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. समुद्रामार्गे रशिया युक्रेनमधील किव शहरात मोठा हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागरिकांना तात्काळ बंकरमध्ये जाण्याचे आदेश देण्यात आले आहे.
युक्रेनवर एअर स्ट्राइक करण्याची तयारी रशियानं सुरू केली आहे. तसा अलर्ट युक्रेनमधील महत्वाच्या शहरांमध्ये एअर सायरनच्या माध्यमातून दिला जात आहे. युक्रेनची राजधानी कीवसह खारकीव्ह सारख्या मोठ्या शहरांमध्ये सायरन वाजू लागले आहेत. तसंच सुमी, चरकासी आणि पोलटावा या शहरांमध्येही सायरन वाजत आहेत. रशियाकडून कोणत्याही क्षणी युक्रेनवर हवाई हल्ला होण्याची शक्यता आहे.
कीवमधील टेलीव्हिजन टॉवरवर हल्ला-
कीवमध्ये एक टीव्ही टॉवरवर हल्ला करण्यात आला. युक्रेनच्या संसदेनं एका फोटोच्या माध्यमातून याची माहिती दिली. टेलिव्हिजन टॉवरवरील हल्ल्यानंतर देशातील टेलिव्हिजन वाहिन्यांचं प्रसारण बंद झालं आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानंही या हल्ल्याची पुष्टी केली आहे.
युक्रेन आणि रशिया आज चर्चा करणार-
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या एका वरिष्ठ सहकाऱ्याने सांगितलं की, "गुरुवारी (3 मार्च) होणाऱ्या चर्चेसाठी युक्रेनचं एक शिष्टमंडळ बेलारुसला येत आहे." रशियन शिष्टमंडळाचं नेतृत्त्व करणारे व्लादिमीर मेडिंस्की यांनी बुधवारी (2 मार्च) पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं की, "माझ्या माहितीनुसार युक्रेनचं शिष्टमंडळ कीवहून रवाना झालं आहे. आम्ही उद्या (गुरुवार, 3 मार्च) चर्चेची अपेक्षा करत आहोत. त्यांनी सांगितलं की, "दोन्ही देशांनी पोलंडच्या सीमेजवळील बेलारुसच्या क्षेत्रात चर्चा करण्यासाठी सहमती दर्शवली आहे." तर युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांच्या कार्यालयानेही शिष्टमंडळ चर्चेसाठी रवाना झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परंतु तिथे पोहोचण्याच्या वेळेची माहिती दिलेली नाही.