नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्र अमिरातमध्ये सीओपी २८ चे परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेचे अध्यक्ष सुल्तान अल जाबेर आणि संयुक्त राष्ट्र हवामान बदलाचे अध्यक्ष सायमन स्टिल यांच्यासह उद्घाटन कार्यक्रमास पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती होती. विकसनशील देशांना हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मदत म्हणून श्रीमंत देशांकडून तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याची मागणी यावेळी मोदींनी केली. या परिषदेला जगभरातील देशांचे प्रतिनिधी हजर असून इटलीच्यापंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचाही फोटो समोर आला आहे.
२०२८ मध्ये आयोजनाचा प्रस्ताव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२८ मध्ये संयुक्त राष्ट्र हवामान परिषदेचे आयोजन करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी दिला, तसेच लोकांच्या सहभागातून ‘कार्बन सिंक’ तयार करण्यावर भर देणारा ‘ग्रीन क्रेडिट’ उपक्रम सुरू केला. दुबईत संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेदरम्यान संबोधित करताना ते म्हणाले की, विकास आणि पर्यावरण संरक्षण यांच्यातील समतोल राखून भारताने जगासमोर एक उत्तम उदाहरण ठेवले आहे. भारत हा जगातील अशा काही देशांपैकी एक आहे जो १.५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानवाढ मर्यादित ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर निर्धारित योगदान देण्याच्या मार्गावर आहे.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल-सिसी आणि तुर्कीचे अध्यक्ष रजब तैयब एर्दोआन येत्या दोन दिवसांत परिषदेत संबोधित करणार आहेत.