एका एअरलाईन कंपनीने महिला प्रवाशाला एक-दोन नव्हे, तर तब्बल 62 लाख रुपयांहूनही अधिकचा दंड ठोठावला आहे. या महिलेने प्रवासादरम्यान विमानातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करून विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यानंतर या महिलेला विमानाच्या एका सीटवर टेपच्या सहाय्याने बांधण्यात आले.
ही घटना गेल्या वर्षी जुलै महिन्यात Dallas हून North Carolina तील Charlotte येथे जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक 1774 मध्ये घडली होती. यावेळी एका महिला प्रवाशाने केबिन क्रूच्या सदस्यांना शिवीगाळ करत विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
महिलेच्या या कृत्यामुळे तिला विमानातील एका सीटला बांधण्यात आले होते. काही प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओही बनवला होता. यानंतर संबंधित महिलेविरोधात चौकशीला सुरुवात झाली होती. चौकशीनंतर आता एअरलाइन कंपनीने आरोपी महिलेविरोधात अॅक्शन घेत, तिला 81,950 डॉलरचा (62 लाख रुपयांहून अधिक) दंड ठोठावला आहे.
nypost.com ने दिलेल्या वृत्तानुसार, फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने ठोठावलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड आहे. तसेच, संबंधित महिलेच्या या कृत्यामुळे विमान साधारणपणे 3 तास लेट झाले होते.