वॉशिंग्टन : टायटॅनिक बुडाली ती जागा आणि जर्जर झालेले ते अजस्त्र जहाज दाखविण्यासाठी पाच पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी उत्तर अटलांटिक समुद्रातून बेपत्ता झाली आहे. रविवारपासून या पाणबुडीचा शोध लागत नाहीय. अमेरिकेच्या तटरक्षक दलाने तातडीने सर्च ऑपरेशन सुरु केले असून पाणबुडीमध्ये ९६ तास पुरेल एवढाच ऑक्सिजन असल्याने चिंतेत वाढ झाली आहे.
बोस्टनच्या कोस्ट गार्डने १९ जून पर्यंत मदत कार्यामध्ये पाणबुडीचा शोध लागला नसल्याचे म्हटले आहे. ही पाणबुडी ओशिनगेट एक्पिडिशंसकडून चालविली जाते. ही पर्यटक पाणबुडी आहे. या कंपनीने घटनेची जबाबदारी घेतली आहे. पाणबुडीमध्ये केवळ ९६ तासांचा ऑक्सिजन असतो. यामुळे घटनेनंतर केवळ ७२ तासच ऑक्सिजन उपलब्ध असणार आहे. तेवढाच वेळ पाणबुडीतील लोकांना शोधण्यासाठी असणार आहे.
टायटॅनिक जहाज १९१२ मध्ये हिमनगाला आदळून बुडाले होते. टायटॅनिकवर तेव्हा २२०० लोक होते, त्यापैकी १५०० लोकांचा मृत्यू झाला होता. जहाज साउथॅम्प्टन ते न्यूयॉर्कला आपल्या पहिल्या प्रवासाला निघाले होते. ग्लेशियरला आदळल्यानंतर त्याचे दोन तुकडे झाले आणि ते सरळ खाली गेले. या अपघातावर सिनेमादेखील आलेला आहे.
हे जहाज पाहण्यासाठी पर्यटकांमध्ये खूप उत्सुकता असते. यासाठी ते मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करतात. टायटॅनिक जहाजाचे अवशेष समुद्र तळाला जवळपास ३८०० मीटर खोल आहेत. कॅनडाच्या उत्तरेकडे अटलांटिक समुद्रात सांगाडा पडलेला आहे. बेपत्ता असलेल्या पाणबुडीमध्ये एक पायलट आणि चार मिशन स्पेशालिस्ट होते. ही पाणबुडी केप कोडच्या पूर्वेला ९०० मैल अंतरावर होती, तेव्हा तिचा संपर्क तुटला. एवढा खोल समुद्रात पाणबुडीचा शोध घेणे एक आव्हानात्मक आहे.