'त्याच्या' लग्नाची वरात निघाली आहे. पांढऱ्या शुभ्र तगड्या घोड्यावर तो स्वार झाला आहे. वरातीबरोबर अत्यंत रुबाबात पावलं टाकत घोडा हळूहळू पुढे सरकतो आहे. त्यावर स्वार झालेल्या नवरदेवाचं तर काय सांगावं? गोल्डन कलरचा शेरवानी घातलेला नवरदेव जितका देखणा, रुबाबदार दिसतो आहे, तसाच त्याचा पेहरावही जाणारे-येणारे लोकही थोडं थांबून ही वरात कौतुकानं पाहताहेत. मिरवणुकीत वेगवेगळी गाणी वाजताहेत. जोडीला ढोल आणि इतर वाद्यं आहेत. या गाण्यांवर नवरदेवाचे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, पाहुणे मंडळी भान हरपून अशी काही थिरकताहेत की ज्याचं नाव ते!...
लग्नमंडपाचा हॉल रंगबिरंगी दिव्यांनी उजळून निघाला आहे. तिथेही पाहुण्यांनी तोबा गर्दी केली आहे. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित आदरसत्कार होईल याकडे बारकाईनं लक्ष पुरवण्यात आलं आहे. त्यासाठीही जातीनं अनेक स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीनं तैनात आहेत. थोड्याच वेळात डोक्यावर छत्रचामर धरलेली, पांढराशुभ्र घरारा आणि दुपट्टा परिधान केलेली, त्यामुळे आपलं नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुललेली नववधू मैत्रिणींच्या गराड्यात हसतमुखानं लग्नमंडपात हजर होते.. तिच्या मैत्रिणींनीही नवरीच्या साजाला सूट होणारा लेहेंगा परिधान केला आहे. जिकडे पाहावे तिकडे उत्साहाला उधाण आलं आहे.
नवरदेवाचं नाव आहे बिलाल नासीर आणि नवरीचं नाव आहे समर इकबाल. दोघांचा जोडा कसा अगदी शोभून दिसतो आहे. त्याबद्दल पाहुणे मंडळींनाही मोठं कौतुक आहे. अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या परिसरात हा लग्नसोहळा सुरू आहे. मूळचा पाकिस्तनचा असलेला २३ वर्षीय बिलाल न्यूयॉर्कच्या बर्नार्ड कॉलेजचा विद्यार्थी, तर २२ वर्षीय नववधू समर अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी. दोघंही एकमेकांशी अतिशय हसून, आपुलकीनं आणि स्नेहानं बोलताहेत. त्यांच्यातला दोस्ताना आपल्याला लगेच दिसून येतोय....
या दोघांचंही हे लव्ह मॅरेज असेल, असं पाहताक्षणीच पाहणाऱ्याला जाणवतंय.. पण वस्तुस्थिती कळली, तर तुम्हालाही धक्का बसेल.. अमेरिकेत सुरू असलेलं हे लग्न म्हणजे लव्ह मॅरेज नसून 'अरेंज्ड मॅरेज' आहे. एवढंच नाही, दोघांनी याआधी एकमेकांना पाहिलेलंही नाही. दाखवा- दाखवीचा मनस्वी मानहानिकारक 'कार्यक्रम'ही झालेला नाही. अर्थात हा 'कार्यक्रम' झालाय, पण त्याला मुलगा- मुलगी हजर नव्हते आणि त्यांना हिंग लावूनही कोणी विचारलेलं नाही. हे स्थळ पाहिलं आणि पसंत केलं, ते दोन्ही बाजूच्या ज्येष्ठांनी आम्हाला जे स्थळ' पसंत असेल, त्याच्याशीच तुला लग्न करावं लागेल, अशी अलिखित 'दांडगाई' तिथे होती.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातील सर्वाधिक प्रगत आणि स्त्री-पुरुष समानता, व्यक्तिस्वातंत्र्याचा मनस्वी पुरस्कार करणाऱ्या अमेरिकेत हे लग्न होत असलं तरी हा प्रकार नवरा आणि नवरी दोघांनाही पूर्णत: मान्य होता. पसंती-नापसंतीचा खेळ 'आशियाई' परंपरेप्रमाणे झाला. त्यासाठी दोन्ही बाजूंनी अक्षरश: शेकडो उमेदवार नाकारले, पण लग्नाच्या दिवसापर्यंत नवरदेव आणि नवरी यांचा यात कोणताच प्रत्यक्ष रोल नव्हता!
आता यापुढचा धक्का अजून बाकीच आहे! हे जे लग्न आत्ता झालंय, ज्यात दोन्हींकडची शेकडो पाहुणेमंडळी हजर होती, 'देवा-ब्राह्मणांच्या' साक्षीनं ज्यांचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर दोन्हींकडच्या पाहुणेमंडळींनी स्वादिष्ट भोजनावर जो ताव मारला आणि तृप्त होत नव्या दाम्पत्याला शुभाशीर्वाद दिलेत, ते लग्न मुळात खरं लग्न
मलाच करा 'नवरा' आणि 'नवरी' !या लग्नातील नवरदेव बिलालला जेव्हा कळलं. आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये अशा प्रकारचं 'स्वयंवर' आयोजित केलं जात आहे. त्यावेळी लगेचच त्यान आपली 'एंट्री' दाखल केली. समरचंही तसंच. नवरा-नवरीच्या सिलेक्शनसाठी विविध विद्यापीठामधून अक्षरश: शेकडो उमेदवार वर- वधूच्या पोशाखात इंटरव्ह्यूसाठी हजर होते. त्या प्रत्येकाला नवरा-नवरी व्हायचं होतं. त्यातून या दोघांची निवड करण्यात आली. नव्हतंचा म्हणजे लग्न तर खरं होतं, त्यातले नवरा-नवरीही 'खरे' होते, पण 'नकली! त्यात त्यांनी केली होती ती फक्त 'भूमिका'। ते होतं एक नाटक! बाकी सगळं मात्र खरं होतं...
अमेरिकेतल्या अनेक विद्यापीठांत आता दरवर्षी अशी लग्नं थाटामाटात लावली जातात. वेगवेगळ्या विद्यापीठांतले विद्यार्थी या लग्नाला आवर्जून उपस्थित असतात. कारण 'वर' एका विद्यापीठातला असला, तर 'वधू' दुसऱ्याच विद्यापीठातली असू शकते. भारतीय, दक्षिण आशियाई लग्नं म्हणजे एक अतिशय मोठा सोहळा असतो. जगभरातील लोकांना या लग्नांचं आकर्षण आहे. या लग्नानिमित्त दोन्ही बाजूच्या 'पाहुणे मंडळींची', संस्कृती आणि विचारांची ओळख व्हावी, जानपहचान आणि विद्यार्थ्यांमध्ये दोस्ती व्हावी या हेतूनं अशी 'मॉक मॅरेजेस' आता जाणीवपूर्वक आयोजित केली जात आहेत.