मॉस्को : युक्रेन युद्धामध्ये विजय मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने रशिया अस्वस्थ झाला आहे. त्या देशाने विद्यमान लष्करप्रमुख जनरल सेर्गेई सुरोविकिन यांच्याकडून युद्धाची सूत्रे काढून घेतली असून ती चीफ ऑफ जनरल स्टाफ जनरल वालेरी गेरासिमोव यांच्याकडे सोपविली आहेत.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, संरक्षण दलांच्या विविध विभागांमध्ये उत्तम समन्वय राहावा म्हणून युद्धाची सूत्रे जनरल वालेरी गेरासिमोव यांच्याकडे सोपविण्यात आली. मात्र अभ्यासकांनी सांगितले की, लष्करप्रमुख सेर्गेई सुरोविकिन यांनी लष्करात स्वत:चा गट निर्माण केला होता व त्याद्वारे देशातील अनेक यंत्रणांवर प्रभाव पाडण्याची हालचाल सुरू केली होती. महत्त्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले करून युक्रेनचे मोठे नुकसान केले. मात्र तरीही युक्रेनचे सैनिक चिकाटीने लढत असून, त्यांनी काही ठिकाणी रशियाच्या सैनिकांना हार पत्करायला लावली. त्यामुळे पुतीन अस्वस्थ झाले आहेत.
‘तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता नाही’
युक्रेन युद्धातून जगभरात तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता नाही. रशिया युक्रेन संघर्षातून पळ काढत आहे. आम्ही त्या देशाच्या लष्कराला चोख प्रत्युत्तर देत आहोत. - वोलोदिमीर जेलेन्स्की, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष