भारताचे सुपरसॉनिक मिसाईल पाकिस्तानात जाऊन पडल्याने मोठी खळबळ उडाली होती. रशिया-युक्रेन युद्धामुळे आशिया आणि युरोपवर तणावाचे ढग दाटलेले आहेत. अशावेळी ही घटना घडल्याने पाकिस्तानची भंबेरी उडाली होती. भारत आता हल्ला करतो की काय, अशी भीती पाकिस्तानींमध्ये निर्माण झाली होती.
पाकिस्तानने मिसाईलवर लक्ष ठेवले होते, असा दावा केला आहे. परंतू, दोन्ही देशांदरम्यान युद्धजन्य परिस्थिती नसल्याने एवढ्या वेगवान मिसाईलला भेदणे पाकिस्तानला तरी अशक्य होते. यामुळे पाकिस्तानने भारताचे मिसाईल आपल्या भागात पडल्याची माहिती देत भारताकडून उत्तर मागितले. यावर भारताने देखभाल सुरु असताना चुकीने ते फायर झाल्याचे सांगितले. तसेच या मिसाईलवर शस्त्रास्त्रे लादलेली नसल्याने कोणताही हाणी झाली नाही.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज संसदेत याची माहिती देणार आहेत. तत्पूर्वी चीन आणि अमेरिकेकडून या विषयावर प्रतिक्रिया आल्या आहेत. किस्तानच्या पंजाब प्रांतात भारताकडून चुकून पडलेल्या क्षेपणास्त्राप्रकरणी दोन्ही देशांनी शक्य तितक्य लवकर चर्चा करावी आणि मार्ग काढावा. तसेच भारताने तपास सुरू करावा, असे मत चीनकडून व्यक्त करण्यात आले आहे.
तर अमेरिकेने भारताची बाजू घेतली आहे. एकेकाळी याच पाकिस्तानसाठी अमेरिकेने भारतावर हल्ले करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्य पाठविले होते. बांग्लादेश मुक्तीसंग्रामावेळी अमेरिकेने जपानच्या समुद्रात असलेला नौदलाचा ताफा, हजारो सैनिकांना घेऊन भारताकडे पाठविला होता. आता तोच अमेरिका भारताच्या बाजुने बोलू लागला आहे. ही केवळ अपघाती घटना होती, तो मुद्दाम केलेला हल्ला नव्हता, हे सर्व जाणूनबुजून करण्यात आल्याचे कोणतेही संकेत नाहीत, भारतानेही अपघाताशिवाय काहीच नसल्याचे म्हटले आहे, असे यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी म्हटले आहे.