वॉशिंग्टन - द यूएस कॅपिटल (अमेरिकेचं संसद भवन) बुधवारी काही काळासाठी रिकामे करण्यात आले. पोलिसांनी एका विमानापासून संभाव्य धोक्याचा हवाला देऊन हा परिसर रिक्त करण्याचे आदेश दिले. यूएस कॅपिलट पोलिसांनी सांगितले की, ते एका अशा विमानावर लक्ष ठेवून आहेत, ज्याच्यापासून संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. ही घटना स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारची आहे.मात्र काही वेळानंतर आता विमानापासून कुठलाही धोका नाही, असे एक अपडेट जारी करून सांगण्यात आले.
यूएस कॅपिटल पोलिसांनी एका अपडेटमध्ये सांगितले की, हे विमान आता कॅपिटल कॉम्पेक्ससाठी धोका नाही आहे. तसेच यूएससीपी पुन्हा प्रवेशासाठी तयार केले जात आहे. पोलिसांनी सांगितले की, यूएस कॅपिटल कॉम्प्लेक्सला खूप सावधानीपूर्वक रिक्त करण्यात आले. विशेष करून जेव्हा कॉम्प्लेक्सला रिकामी करण्याचे आदेश दिले गेले होते, तेव्हा सदन आणि सिनेट सभागृहात नव्हते.
काही रिपोर्ट्सनुसार मिलिट्री एप्रिसिएशन नाईटदरम्यान, द यूएस कॅपिटल कॉम्प्लेक्सजवळ असलेल्या एका स्पोर्ट्स स्टेडियममध्ये पॅराशूटचं प्रदर्शन होत होतं. एनबीसी न्यूजचे सीनियर कॅपिटल हिल वार्ताहर गॅरेट हाके यांनी एका ट्विटमध्ये सांगितले की, यूएस कॅपिटल रिकामे करण्याच्या आदेशांदरम्यान, भवनाजवळ काही लोकांना पॅराशूटच्या माध्यमातून उतरताना पाहिले. आता ते कुठे उतरले याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका अन्य ट्विटमध्ये गॅरेट हाके यांनी सांगितले की, ते लोक आर्मी गोल्डन नाईट्सच्या एका प्रदर्शनाचा भाग होते आणि नॅशनल पार्कमध्ये पॅराशूटमधून उतरत होते.
आता सांगण्यात येत आहे की, यूएस कॅपिटल्सच्या अधिकाऱ्यांसोबत या कार्यक्रमाबाबत योग्यपणे समन्वय स्थापित करण्यात आला नव्हता. ज्या विमानामधून यूएस कॅपिटलला धोक्याची शक्यता वाटली होती, ते स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सुमारे ६ वाजून ५० मिनिटांनी अँड्र्युज येथे उतरले. गेल्या वर्षी ६ जानेवारी रोजी माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांच्या एका समुहाने द यूएस कॅपिटल वर हल्ला केला होता. त्यांनी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. त्यानंतर कॅपिटल हिलमध्ये संरक्षण व्यवस्था अधिक कडक करण्यात आली होती.