कीव्ह/मॉस्को : अमेरिकेसह काही देशांनी लादलेल्या कडक निर्बंधांची पर्वा न करता रशियाने गुरुवारी युक्रेनवर आक्रमण केले. युक्रेन व रशियाच्या लष्करात झालेल्या संघर्षात १०० हून अधिक जण ठार झाले आहेत. गुरुवारी भारतीय वेळेनुसार सकाळी सव्वा आठ वाजता रशियाच्या विमानांनी युक्रेनमधील कीव्ह, खार्किव्ह यासह काही शहरांवर भीषण बॉम्ब व क्षेपणास्त्रांचे हल्ले केले. दरम्यान, रशियन सैन्यांचा चर्नाेबिल अणू प्रकल्प ताब्यात घेण्याचे प्रयत्न असल्याचा आराेप युक्रेनचे राष्ट्रपती वाेलाेदिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. तर ब्रिटनचे पंतप्रधान बाेरीस जाॅन्सन यांनी रशियावर कठाेर निर्बंध जाहिर केले. ब्रिटनमधील सर्व प्रमुख रशियन बॅंकांच्या मालमत्ता गाेठविण्यात आल्या असून सर्व वित्तीय संस्थांवर बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, युक्रेनी लष्कराचे ७४ तळ उद्ध्वस्त केले असून त्यात हवाई दलाच्या ११ तळांचा समावेश असल्याचा दावा रशियाने केला आहे. तर रशियाची ६ लढाऊ विमाने व एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियाचे सैन्य कीव्हपर्यंत पोहोचले. तसेच रशियाचे काही रणगाडेही उद्ध्वस्त केल्याचे युक्रेनने म्हटले आहे.
नाटोकडून १२० युद्धनौकांचा ताफा सज्जरशियाने युक्रेनवरील लष्करी कारवाई ताबडतोब थांबवावी व आपले सैन्य माघारी न्यावे, असा इशारा नाटोने दिला आहे. अनेक लढाऊ विमाने तसेच भूमध्य सागराच्या हद्दीत १२०हून अधिक युद्धनौकांचा ताफा नाटोने सज्ज ठेवला आहे.
दुतावासाकडून विद्यार्थ्यांची सोयकीव्हमध्ये भारतीय दूतावासाने जवळच्या एका शाळेमध्ये २०० हून अधिक विद्यार्थ्यांची साेय केली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी दूतावासाने जी यंत्रणा उभारली आहे, त्यात तेथे कार्यरत असलेल्या मराठी अधिकाऱ्याची महत्त्वाची भूमिका आहे. माधव सुलफुले असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील मुखेडचे आहेत, तर त्यांचे शिक्षण लातूरमध्ये झाले आहे. युक्रेनमध्ये सुमारे १५ ते २० हजार भारतीय अडकले असून त्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना केल्या आहेत. हे भारतीय युक्रेनमधून पोलंडमार्गे भारतात येऊ शकतात.
रशियाक़डून हल्ले
- रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याची घोषणा करताच पुढील पाच मिनिटांत युक्रेनच्या प्रमुख शहरांवर हल्ले सुरू झाले.
- युक्रेनवर रशिया, बेलारूस आणि क्रिमिया या तीन बाजूंनी हल्ला करण्यात आला आहे.
- लुहान्स्क, खार्कीव, चेर्नीव, सुमी आणि जेटोमीर या प्रांतांवर हल्ले करण्यात आले आहेत.
- रशियन पायदळानेही युक्रेनमध्ये घुसून सीमावर्ती भागातील काही गावांवर कब्जा मिळवला आहे.
युक्रेनवर रशियाने केलेल्या आक्रमणात कोणीही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी कधी पाहिले नव्हते इतके गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अमेरिका व अन्य देशांचे नाव न घेता दिला. युक्रेनने ‘नाटो’मध्ये सामील होऊ नये, या रशियाने सातत्याने केलेल्या मागणीकडे अमेरिका व तिच्या मित्रदेशांनी दुर्लक्ष केले, असा आरोप पुतिन यांनी केला आहे. युक्रेनवर कब्जा करण्याचा आमचा अजिबात विचार नाही. व्लादिमीर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया
भारतीय बाजारावर परिणाम युद्धामुळे झालेले परिणामयुद्धामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झाली. त्याचा परिणाम होऊन मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये जोरदार घसरगुंडी झाली. शेअर बाजारामध्ये २३ मार्च २०२० नंतरची सर्वांत मोठी घसरण तर आतापर्यंतची बाजारातील चौथ्या क्रमांकाची घसरण ठरली आहे.