कीव्ह :
रशियाने युक्रेनवर गेल्या चोवीस तासांत केलेल्या हल्ल्यांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला व १४ जण जखमी झाले आहेत. येत्या काही दिवसांत युद्ध आणखी तीव्र होणार आहे. पूर्व युक्रेनमध्ये रशिया जोरदार हल्ले चढविण्याची शक्यता आहे, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
त्यांनी सांगितले की, युक्रेनमध्ये केलेल्या युद्ध गुन्हेगारीची जबाबदारी घेणे रशिया टाळत आहे. आपल्या चुका स्वीकारून त्याबद्दल माफी मागण्यास रशिया तयार नाही. रशियाने केलेल्या गैरकृत्यांकडे जगाने काही प्रमाणात दुर्लक्ष केले. त्याच्या अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, युक्रेन या गैरकृत्यांना पायबंद घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. युक्रेनमध्ये केलेल्या अत्याचारांची रशियाला एक ना एक दिवस कबुली द्यावीच लागेल. आणखी मदत करावी...१. जेलेन्स्की म्हणाले की, युक्रेनला जर्मनीसह अन्य पाश्चिमात्य देशांनी आणखी मदत करावी. जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ स्कोल्झ व जेलेन्स्की यांच्यात युक्रेनच्या स्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली.२. रशियावर आणखी किती कडक निर्बंध लादायचे याबाबतही या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. हवाई हल्ल्यांपासून वाचविण्यासाठी युक्रेनने उभारलेली संरक्षक फळी उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियाने केला आहे.
युक्रेनची हवाई हल्लेविरोधी यंत्रणा उद्ध्वस्त?- युक्रेनची हवाई हल्लेविरोधी यंत्रणा उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियाने केला आहे.- या युद्धामध्ये रशियाला संपूर्ण युक्रेनवर अजूनही कब्जा करता आलेला नाही. - रशियाच्या लष्कराला काही ठिकाणी हवाई संरक्षणाची ढाल न देता आल्यामुळे नुकसान झाले आहे. - हे लक्षात घेऊन रशियाने युक्रेनच्या हवाई हल्लेविरोधी यंत्रणेला गेल्या काही दिवसांत लक्ष्य केले होते.