Israel-Hamas: मागील एका महिन्यापासून इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना, हमास यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अनेक देशांनी आवाहन केले आहे. दरम्यान, हे युद्ध आता थांबण्याची शक्यता आहे. अमेरिका-इस्रायल-हमास, यांच्यात एक करार होण्याची शक्यता आहे. त्या बदल्यात, गाझामध्ये बंदी असलेल्या डझनभर महिला आणि मुलांना सोडले जाईल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रस्तावित करारात असे नमूद केले जाईल की, पाच दिवस युद्धविराम दिला जाईल आणि या कालावधीत, दर 24 तासांच्या अंतराने 50 किंवा त्याहून अधिक कैद्यांचे गट सोडले जातील. अशाप्रकारचा करार झाला आहे की नाही, याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सूमारे 240 इस्रायली आणि परदेशी नागरिकांना हमासने ओलिस ठेवल्याची माहिती आहे. ओलिसांचे कुटुंब, स्थानिक लोकांसह बेंजामिन नेतन्याहू राजवटीचा निषेध करत आहेत. काल 20 हजारांहून अधिक लोकांनी नेतान्याहू यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली आणि ओलीसांना लवकरात लवकर परत आणण्याची मागणी केली. दरम्यान, युद्धबंदीबाबत वॉशिंग्टन पोस्टचा अहवाल समोर आल्यानंतर, जो बायडेन प्रशासनाने कोणत्याही संभाव्य कराराचे खंडन केले आहे.
इस्रायल जोपर्यंत सर्व पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करत नाही तोपर्यंत इस्रायल-परदेशी ओलीसांची सुटका केली जाणार नाही, असेही हमासकडून सांगण्यात येत आहे. काल असेही वृत्त आले होते की नेतन्याहू राजवट यासाठी तयार आहे, परंतु सर्व कैद्यांच्या सुटकेवर सहमत नाही. याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आले नाही, त्यामुळे यात किती तथ्य आहे, हे येणाऱ्या काळात कळेलच.