अवघे जग चीन तैवान आणि अमेरिकेच्या वादाकडे लक्ष लावून असताना मध्य आशियातील एका देशाने दुसऱ्या देशावर हल्ला करून मोठा भूभाग ताब्यात घेतला आहे. अझरबैजानने तुर्कीकडून मिळालेल्या बाय़रकतार ड्रोनने आर्मिनियावर जोरदार हल्ले केले. आर्मिनियाची शस्त्रास्त्रे उध्वस्त करून नागर्नो-कराबाख अनेक भागांवर कब्जा केला आहे.
महत्वाचे म्हणजे दोन्ही देशांमध्ये रशियाने शस्त्रसंधी करून दिली होती. अझरबैजानने नागर्नो-कराबाखच्या वादग्रस्त भागात सीजफायरचे उल्लंघन केले आहे, असे रशियाने म्हटले आहे. आर्मेनियाच्या बेकायदेशीर सशस्त्र गटांनी केलेल्या हल्ल्यात आमचे तीन सैनिक मारले गेले, असा आरोप अझरबैजानने केला होता.
या हल्ल्याला प्रत्यूत्तर म्हणून अझरबैजानने आर्मिनियावर खतरनाक ड्रोन हल्ला केला आहे. यापूर्वी य़ा दोन देशांमध्ये 2020 मध्ये सहा महिने युद्ध सुरु होते. यामध्ये साडे सहा हजारहून अधिक लोक मारले गेले होते. यानंतर रशियाने हस्तक्षेप करत दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी केली होती. या संपूर्ण वादग्रस्त भागात अनेक रशियन शांती सैनिक तैनात आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून अझरबैजानच्या सशस्त्र सैनिकांनी युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.
अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, काराबाखच्या सैन्याने लाचिन जिल्ह्यात आपल्या एका सैनिकाला ठार मारले आहे. यासाठी आर्मेनियाला जबाबदार धरले आहे. अझरबैजानच्या लष्कराने म्हटले की, त्यांनी या प्रदेशातील मोक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या उंचीच्या भागांवर कब्जा केला आहे. अझरबैजानला तुर्की आणि पाकिस्तानी लष्कराकडून मोठी मदत मिळत आहे.