इस्रायलवरील हमास युद्धावरून जगात दोन गट पडले आहेत. एकीकडे भारत, अमेरिका, ब्रिटनसारखे देश तर दुसरीकडे मुस्लिम देश अशी परिस्थिती उभी ठाकली आहे. गेल्या पाच दिवसांपासून इस्रायलच्या सैन्याने गाझाला सडेतोड उत्तर दिले आहे. हमासच्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणारी इस्लामिक युनिव्हर्सिटी देखील इस्रायलने उध्वस्त केली आहे. हमासला पोसल्याचे पाप आता गाझाचे सामान्य नागरिक भोगत आहेत.
इस्रायलने गाझाचा सर्व संपर्क तोडला आहे. अन्न, पाणी आणि वीज आदी सर्व गोष्टी बंद केल्या आहेत. बॉर्डरवर नाकाबंदी केल्याने पॅलेस्टिनीन आणि हमासला चांगलाच धडा शिकवण्याच्या बेतात इस्रायल आहे. यावरून वेगवेगळे देश हळहळ व्यक्त करत आहेत. इस्रायलला माणुसकीचे धडे देत आहेत. यावर इस्रायलने जगाने आम्हाला नैतिकतेचे शिकवू नये असा इशारा दिला आहे.
इस्रायलमध्ये राहणारे इस्रायली आणि अन्य देशांच्या नागरिकांना, स्रियांना देखील ओलीस ठेवले आहे. या लोकांची जोवर सुटका हमास करत नाही तोवर आपण अन्न, पाणी आणि वीज सुरु करणार नाही असा इशारा इस्रायल सरकारने दिला आहे.
हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने युद्ध घोषित केले आणि गाझावर बॉम्बफेक केली. तेथे सलग पाच दिवस रॉकेट आणि क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. इस्रायलच्या कारवाईमुळे गाझाला वेढले गेले आहे. जर इस्रायलने गाझामधील बॉम्बफेक थांबवली नाही, तर ते अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांना एक एक करून फासावर लटकवतील आणि लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे जगाला दाखवतील, असा इशारा हमासने दिला होता. त्यावर इस्रायलने ही कारवाई केली आहे.