दुबई : अलीकडेच विक्रमी पावसामुळे दुबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्याखाली आल्याने विमानसेवा ठप्प झाली होती. या पार्श्वभूमीवर दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी रविवारी चक्क दुबईत नवीन विमानतळ बांधण्याची घोषणा केली असून, ते जगातील सर्वांत मोठे विमानतळ ठरणार आहे. याशिवाय ते एक बंदर, शहरी केंद्र आणि नवीन जागतिक केंद्र असेल. या विमानतळासाठी सुमारे २.९ लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
नवीन विमानतळाला अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव दिले जाईल आणि तेथे पाच समांतर धावपट्ट्या असतील. या विमानतळाची तब्बल २६ कोटी प्रवासी वाहन क्षमता असेल तर परिसराला सुमारे ४०० दरवाजे असणार आहेत.
मालवाहतूक हवाई वाहतूक क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपन्यांची कार्यालये या विमानतळावर असतील. शेख मकतूम यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये ही घोषणा केली. त्यात त्यांनी भावी पिढींचा निरंतर आणि शाश्वत विकास हे विमानतळ सुनिश्चित करेल, असा विश्वास व्यक्त केला.
१.२० कोटी टन
माल वाहतूक दरवर्षी करण्याची क्षमता.
७० एकर असेल विमानतळाचे क्षेत्रफळ ५ समांतर धावपट्ट्या.