पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा लवकरच निवृत्त होत आहेत. या प्रसंगी त्यांनी सैन्याला आज अखेरचे संबोधित केले. यावेळी त्यांनी १९७१ च्या बांगलादेश मुक्ती लढ्यावर भाष्य केले. १९७१ ला सैन्य हरले नव्हते तर राजनैतिक अपयशामुळे हार पत्करावी लागल्याचे ते म्हणाले.
१९७१ च्या युद्धात आपले सैन्य धाडसाने लढले. मला या युद्धाबाबत काही खुलासे करायचे आहेत. जे सांगितले जाते ते दुरुस्त करायचे आहे. पाकिस्तानी लष्कराचे सैनिक देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. पाकिस्तानी लष्कर काहीही करू शकते, पण देशहिताच्या विरोधात काहीही करणार नाही, अशी मर्दुमकी त्यांनी गाजविली. राजकीय पक्ष आणि लोकांना लष्करावर टीका करण्याचा अधिकार आहे पण त्यांनी लष्करावर टीका करण्यासाठी शब्द निवडले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
ज्यांना असे वाटते की सैन्य आणि जनता यांच्यात तेढ निर्माण होईल, असे काहीही घडणार नाही, असेही ते म्हणाले. पाकिस्तानी लष्कराचा राजकारणातील हस्तक्षेप घटनाबाह्य आहे. अशा स्थितीत लष्कराने भविष्यात कोणत्याही राजकीय प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही, असा निर्धार केला आहे. आम्ही या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करू, असे आश्वासन बाजवा यांनी पाकिस्तानींना दिले.
भारतीय लष्कराने जगात सर्वाधिक मानवी हक्कांचे उल्लंघन केले आहे. पण भारतातील लोक लष्करावर क्वचितच टीका करतात, असे म्हणत त्यांनी भारतावर तोंडसुख घेण्याची खुमखुमी शमवून घेतली आहे.
जनरल बाजवा (61) तीन वर्षांच्या मुदतवाढीनंतर 29 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाला संरक्षण मंत्रालयाकडून सोमवारी नवीन लष्करप्रमुखांच्या नियुक्तीबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे. यात पाच जणांची नावे आहेत. त्यापैकी एकाची जनरल जावेद बाजवा यांचा उत्तराधिकारी म्हणून निवड केली जाणार आहे, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.