कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाच्या इतिहासात समुद्रामध्ये झालेल्या सर्वांत मोठ्या हल्ल्यात बुडालेल्या जहाजाचे अवशेष तब्बल ८१ वर्षांनी फिलिपाइन्स देशाच्या लुझॉन बेटाजवळ १३ हजार फूट खोल पाण्यात सापडले आहेत. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानच्या एसएस मॉन्टेव्हिडीओ मारू या जहाजावर झालेल्या हल्ल्यात त्यातील १०६० युद्धकैदी मरण पावले होते. सायलेन्ट वर्ल्ड फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते गेल्या १२ दिवसांपासून खोल समुद्रात या जहाजाचे अवशेष शोधत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
एसएस मॉन्टेव्हिडीओ मारू या जपानी जहाजावर यूएसएस स्टर्जियन या अमेरिकी पाणबुडीने ४ टार्पेडोंचा मारा केल्याने ते फिलिपाइन्सनजीकच्या समुद्रात १ जुलै १९४२ रोजी बुडाले होते. युद्धामध्ये पकडलेले ऑस्ट्रेलियाचे ८५० सैनिक व अन्य लोक असे १०६० युद्धकैदी होते. हे जपानी जहाज पापुआ न्यू गिनी येथून युद्धकैद्यांना घेऊन चीनच्या हैनान प्रांताकडे जात होते. त्यात असलेल्या युद्धकैद्यांबाबत त्यांच्या नातेवाइकांनी अनेक वर्षे खात्रीलायक माहिती मिळत नव्हती. या जहाजाचे अवशेषही सापडत नव्हते. (वृत्तसंस्था)
अवशेष आहे त्याच जागी ठेवणारऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सांगितले की, एसएस मॉन्टेव्हिडीओ मारू जहाजावरील हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या नातेवाइकांना त्या जहाजाचे अवशेष मिळाल्याचे वृत्त ऐकून थोडासा दिलासा मिळाला असेल. जहाजाचे व त्यातील मानवी अवशेष आता आहेत त्या जागेवरून दुसरीकडे न हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जहाजात युद्धकैदी आहेत याची हल्ला करणाऱ्या अमेरिकी पाणबुडीला कल्पना नव्हती. हल्ला झाल्यानंतर हे जहाज अवघ्या ११ मिनिटांत समुद्रात बुडाले.
संशोधकांच्या डोळ्यांत तरळले अश्रूसायलेन्ट वर्ल्ड फाउंडेशनच्या संशोधकांनी सांगितले की, फिलिपाइन्सच्या जवळच्या समुद्रात एसएस मॉन्टेव्हिडीओ मारू या जहाजाच्या अवशेषांचा शोध लागल्याचा आम्हाला आनंद जरूर झाला, पण या जहाजाच्या दु:खद घटनेची आठवण येऊन आमच्या डोळ्यांत अश्रू तरळले.