लंडन : ऋषी सुनाक हे ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होऊ शकतात. त्यांची कार्यक्षमता ही त्यांना भावी पंतप्रधान होण्यास अतिशय पूरक आहे. कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे सुनाक हे २०२० पासून चॅन्सेलर ऑफ एक्स्चेकर असून, ते २०१९ ते २०२० या कालावधीत चीफ सेक्रेटरी टू द ट्रेझरी होते. विशेष म्हणजे कोरोना महामारीने जर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पायउतार व्हावे लागले असते तर जनतेतून ऋषी सुनाक यांनाच पसंती होती. २०१५ मध्ये सुनाक नॉर्थ यॉर्कशायरमधील रिचमंडमधून संसदेवर निवडून गेलेले आहेत. १२ मे, १९८० रोजी जन्मलेले सुनाक यांचे शिक्षण स्टँडर्ड ग्रॅच्युएट स्कूल ऑफ बिझनेस, लिंकन कॉलेज आणि विनचेस्टर कॉलेजमध्ये झाले.
गेल्या काही दिवसांत सुनाक हे दूरचित्रवाणी वाहिन्यांवर सतत दिसत होते. ते पंतप्रधान झाले तर ब्रिटनच्या राजकारणाला नवे वळण मिळेल, असे बोलले जाते. ते गांभीर्याने राजकारण करणारे आहेत. वादळी ठरलेल्या पहिल्याच अर्थसंकल्पात सुनाक यांचे पूर्वाधिकारी साजिद जाविद यांनीही त्यांना पाठिंबा दिला. या अर्थसंकल्पातील सुनाक यांच्या कामगिरीवर सिमाेन वॉल्टर्स म्हणालेदेखील की, ‘बोरीस जॉन्सन यांचे उत्तराधिकारी ऋषी सुनाक होऊ शकतील का?’ कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे पुढील नेते म्हणूनही त्यांच्या कडे पाहिले जाते. सारमाध्यमांतूनच सुनाक यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहिले जात आहे असे नाही तर समाजमाध्यमांवर सामान्य लोकही त्यांची चर्चा करतात. ब्रिटनच्या लोकसंख्येत हिंदू लोकसंख्या १.३ टक्के आहे.
गोल्डमन बँकेत नोकरी -१९६० मध्ये सुनाक यांचे आईवडील भारतातून ब्रिटनमध्ये आले. ऋषी सुनाक हे राजकारणात सक्रिय व्हायच्या आधी गोल्डमन सॅक बँकेत काम करीत होते. नंतर ते गुंतवणूक कंपनीचे सहसंस्थापकही होते. सुनाक यांनी भारतीय अब्जाधीश आणि इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता हिच्याशी विवाह केला. या जोडप्याला दोन मुली आहेत.