देइर-अल-बलाह : इस्रायल- हमासमध्ये आठवडाभरापासून सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने पॅलेस्टिनी नागरिकांना उत्तर गाझा परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले. त्यासाठी रविवारी तीन तासांची मुदतही दिली; परंतु, येथील रुग्णालयांमध्ये नवजात शिशूंसह आयसीयूतील दाेन हजार लोकांना बाहेर काढणे, म्हणजे जणू त्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यासारखे आहे, अशी चिंता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली.
रुग्णालयाकडे सध्या केवळ दोन दिवस पुरेल इतकेच इंधन शिल्लक आहे. ते संपल्यास हजारो निष्पाप रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्राने दिला. अन्न-पाण्याअभावी गाझामध्ये लोकांचे प्राणांतिक हाल होत आहेत. लहान मुलांना किमान दूधही मिळत नसल्याचेही परिस्थिती निर्माण झाली आहे. मुलांसाठी ब्रेड, दूध घेण्यासाठी लोकांची धावपळ होत आहे.
पाऊल उचलण्यापूर्वी चालते व्हा! उत्तर गाझा रिकामा करण्यासाठी इस्रायलने आदेश जारी केले. त्यात म्हटले की, तातडीने हा परिसर रिकामा करा आणि दक्षिणेकडे चालते व्हा. हमासला संपविण्यासाठी आम्ही लवकरच मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहोत. उत्तर गाझात सुमारे १० लाख पॅलेस्टिनी राहतात. दुसरीकडे मात्र हमासने गाझातील लोकांना घरातच राहण्याचे आदेश दिले.
रुग्णालयात खाटा भरल्या; झाडाखाली होतात उपचारगाझातील प्रमुख रुग्णालय असलेल्या अल-शिफा रुग्णालय जखमी लोकांमुळे अक्षरश: भरून वाहत आहे. पाय ठेवायलाही जागा नसल्याने परिसरातील झाडाखाली जखमींवर उपचार केले जात आहे. लोकांना सध्या रुग्णालय हीच सुरक्षित जागा वाटत आहे. हल्ल्यात घरे जमीनदोस्त झाल्याने अनेकजण उपचारानंतरही रुग्णालयातच राहत आहेत.
हमासला संपवणारच इस्रायली नागरिकांच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल. हमासला पूर्णपणे संपविल्याशिवाय शांत बसणार नाही. यासाठी जगभरातील नेत्यांशी चर्चा सुरू आहे. - बेंजामिन नेतन्याहू, पंतप्रधान, इस्रायल
आतापर्यंत झाले सर्वाधिक मृत्यूइस्रायलच्या हल्ल्यात आठवडाभरात २,३२९ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला. आतापर्यंत झालेल्या पाच युद्धांपैकी या युद्धात सर्वाधिक बळी गेले.२०१४ मध्ये २,२५१ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला होता.हमासच्या हल्ल्यात भारतीय वंशाचे २ इस्रायली अधिकारी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बायडेन यांची नेतन्याहू, अब्बास यांच्याशी चर्चा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू व पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी चर्चा केली.पॅलेस्टिनी लोकांसाठी हमास लढत नसल्याने त्यांचा विरोध करा, असे ते म्हणाले.