...तर युक्रेन केव्हाही रशियाचा होईल, मला माझा पैसा परत हवा; डोनाल्ड ट्रम्पची झेलेन्स्कींना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 17:37 IST2025-02-11T17:35:42+5:302025-02-11T17:37:49+5:30
ट्रम्पनी मेक्सिकोच्या खाडीचे नाव बदलून अमेरिकन खाडी केले आहे. तसेच कॅनडाला देखील अमेरिकेचे राज्य बनविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याचबरोबर गाझा पट्टी देखील ताब्यात घेण्याची भाषा केली आहे.

...तर युक्रेन केव्हाही रशियाचा होईल, मला माझा पैसा परत हवा; डोनाल्ड ट्रम्पची झेलेन्स्कींना धमकी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वसुली मोहिम जोरदार राबविण्यास सुरुवात केली आहे. मेक्सिकोच्या खाडीचे नाव बदलून अमेरिकन खाडी केले आहे. तसेच कॅनडाला देखील अमेरिकेचे राज्य बनविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याचबरोबर गाझा पट्टी देखील ताब्यात घेण्याची भाषा केली आहे. एवढेच नाही तर आता आम्हाला आमचा पैसा परत हवा आहे, अमेरिकेने जर युक्रेनला मदत बंद केली तर युक्रेन रशियाचा होईल अशी धमकी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना दिली आहे.
अमेरिकेची मदत सुरु ठेवावी असे वाटत असेल तर युक्रेनने मौल्यवान खनिजे अमेरिकेला त्या प्रमाणात पुरवावीत, असा प्रस्ताव ट्रम्प यांनी युक्रेनसमोर ठेवला आहे. युक्रेन कोणत्याही दिवशी रशियाचा होऊ शकतो. रशियाशी युद्धावेळी अमेरिकेने जेवढी मदत केलीय, ती परत घेण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी थेट धमकीच ट्रम्प यांनी दिली आहे.
युक्रेनवर हल्ला केलेला तेव्हाच रशिया जिंकेल असे जगाला वाटले होते. परंतू, अमेरिकेच्या मदतीने युक्रेनने रशियाचे आक्रमण परतवून लावले होते. अमेरिकेने अत्याधुनिक शस्त्रास्त्रे युक्रेनी सैन्याला पुरविली होती. यापैकीच एक होते किंजल मिसाईल. या मिसाईलने रशियाच्या शेकडो सैनिकांना, रणगाड्यांना नेस्तनाभूत केले. याचबरोबर अमेरिका, युरोपमधील कंत्राटी सैन्य देखील युक्रेनच्या मदतीला आले. रशियन सैन्याची धुळधाण उडाल्याने अखेरीस रशियालाही बाहेरच्या देशातून सैन्य आणावे लागले होते. आजही अमेरिका युक्रेनला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे पुरवत आहे.
ट्रम्प सध्या अमेरिकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर भर देत आहेत. यामुळे त्यांनी परदेशांतून आलेल्या अवैध प्रवाशांना बाहेर हाकलण्यास सुरुवात केली आहे. एलन मस्क असलेल्या समितीने अमेरिकेचा वाया जात असलेला पैसा रोखण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून युक्रेनला देत असलेल्या मदतीच्या बदल्यात जर युक्रेन दुर्मिळ खनिजे देत असेल तर ती मदत सुरु ठेवण्याचा विचार ट्रम्प करत आहेत. या खनिजांचा वापर इलेक्ट्रॉनिक्स, ऊर्जा निर्मिती आणि संरक्षण क्षेत्रासाठी करता येणार आहे.
आमचा पैसा तिकडे जात आहे, तो सुरक्षित रहावा असे मला वाटते. युक्रेनकडे खजिना आहे तो आम्हाला द्यावा. आम्ही करोडो डॉलर खर्च करत आहोत. युक्रेन आमच्यासोबत यासाठी एक समझोता करू शकतो. जर त्यांना करायचा नसेल तर ठीक आहे. मला माझा पैसा परत हवा आहे. मी त्यांना कळविले आहे, आम्हाला ५०० अब्ज डॉलर्सचे खनिज द्यावे, आता आम्ही आधीसारखा पैसा देणार नाही, असे ट्रम्पनी म्हटले आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्पनी हे म्हटले आहे.