...तर आम्ही शत्रूवर अण्वस्त्र हल्ला करू; रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 09:05 AM2023-08-01T09:05:26+5:302023-08-01T09:05:47+5:30
आता युद्ध थेट रशियात पोहोचले आहे, असा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी दिला. रशियाची राजधानी मॉस्को येथे ड्रोन हल्ल्यानंतर जेलेन्स्की म्हणाले की, रशियाच्या भूमीवर हल्ले होण्याच्या घटना घडणारच होत्या. दोन देशांमधील युद्धात अशा घटना होणे स्वाभाविक आहे.
मॉस्को : नाटो देशांचा पाठिंबा असलेल्या युक्रेनने रशियाच्या काही भूभागावर कब्जा केला तर आम्ही शत्रूवर अण्वस्त्र हल्ला करू शकतो, असा इशारा रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमीत्री मेदवेदेव यांनी दिला आहे.
त्यांनी सांगितले की, युक्रेनने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यांत रशियाचा भूभाग जिंकून घेतला तर आम्ही अण्वस्त्र हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यावेळी आमच्यासमोर कोणताही अन्य पर्याय असणार नाही. अणुयुद्ध होऊ नये, अशी आमचीही इच्छा आहे. मात्र तशी परिस्थिती उद्भवली तर रशिया ठाम निर्णय घेण्यास सक्षम आहे.
आता युद्ध रशियात पोहोचले - जेलेन्स्की
आता युद्ध थेट रशियात पोहोचले आहे, असा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी दिला. रशियाची राजधानी मॉस्को येथे ड्रोन हल्ल्यानंतर जेलेन्स्की म्हणाले की, रशियाच्या भूमीवर हल्ले होण्याच्या घटना घडणारच होत्या. दोन देशांमधील युद्धात अशा घटना होणे स्वाभाविक आहे.
युक्रेनचे तीन ड्रोन पाडल्याचा रशियाच्या लष्कराने रविवारी दावा केला. युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियानेही युक्रेनवर हल्ला केला. यात इमारतींचे मोठे नुकसान झाले.
युरोपने दिला चीन, रशियाला इशारा
- युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन यांनी सोमवारी वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रावरील बीजिंगचा दावा अमान्य केला.
- यासाठी त्यांनी २०१६ च्या युरोपियन युनियन लवादाच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला. युक्रेन किंवा हिंद-प्रशांत महासागर, युरोप आक्रमकता सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी रशिया, चीनला दिला.
हुकूमशाही नेते कोणत्याही धोक्याची पर्वा न करता युक्रेनवर आक्रमण करत आहेत. रशियाच्या युक्रेनविरुद्धच्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय नियमांचा पायाच हादरला आहे. हे युरोपियन युनियनच्या नियमांचे उल्लंघन आहे. त्यामुळे युरोप आक्रमक रशियाच्या विरोधात युक्रेन करत असलेल्या प्रतिहल्ल्याचे समर्थन करतो.
- उर्सुला वॉन डेर लेन, अध्यक्षा, युरोपियन युनियन