पॅरिस : जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत संयुक्त राष्ट्राच्या ऐतिहासिक हवामान बदल परिषदेस सोमवारी येथे प्रारंभ झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह १५० देशांचे नेते यात सहभागी झाले आहेत. ही परिषद १२ दिवस चालणार आहे. सुरक्षेसाठी परिसरात २८०० पोलीस, तर शहरात सहा हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी सोमवारी सकाळी संमेलनस्थळी आलेल्या नेत्यांचे स्वागत केले. मोदी आणि अन्य नेते महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे. हवामान बदलाबाबत तोडगा काढणे, जागतिक तापमान दोन डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी ठेवणे हा संमेलनाचा उद्देश आहे. (वृत्तसंस्था)भारत आपली जबाबदारी पूर्ण करील हवामान बदलाबाबतच्या प्रयत्नांचा भाग म्हणून भारत आपली जबाबदारी पूर्ण करण्यास कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि मोदी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.मोदी म्हणाले की, देशात विकास आणि पर्यावरण, सुरक्षा यांना समान महत्त्व देण्यात येत आहे. चर्चेवेळी पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, अमेरिकेचे विदेशमंत्री जॉन केरी हेही उपस्थित होते.