चीनचा झगडा नाही असा त्याच्या शेजारी एकही देश नाही. दरम्यान, तैवान हा तर आपलाच अविभाज्य असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत असतो. आता या तैवानमध्ये कट्टर चीनविरोधा पक्षाचा पुन्हा एकदा विजय झाल्याने ड्रॅगनचा जळफळाट झाला आहे. तैवानमधील निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना चीनने तैवान हा आपला अंतर्गत विषय असल्याचे म्हटले आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, तैवानमध्ये जे काही बदल होत आहेत त्याचं पायाभूत तत्त्व हे आहे की, जगामध्ये एकच चीन आहे. तसेच तैवान त्याचा भाग आहे. या तथ्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत बदल होणार नाही. चीनने सांगितले की, आम्ही वन चायना पॉलिसीवर विश्वास ठेवतो. तैवानच्या स्वातंत्र्याला आमचा विरोध आहे. वन चायना ह्या आमच्या धोरणात कुठलाही बदल होणार नाही. तसेच चीनचा सिद्धांत कायम टेवण्याबाबतच्या आंतरराष्ट्रीय समुदायाच्या धोरणातही कुठलाही बदल होणार नाही.
त्यांनी सांगितले की, तैवान राज्यामध्ये शांतता आणि स्थैर्य कायम ठेवण्यासाठी वन चायना पॉलिसी हा भक्कम आधार आहे. आंतरराष्ट्रीय समुदायही केवळ वन चायना सिद्धांताचं पालन करेल आणि तैवानच्या स्वातंत्र्याबाबत फुटीरतावादी कृत्यांना विरोध करेल.
तैवानमध्ये सत्ताधारी डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टीची नेते लाई चिंग ते यांनी शनिवारी राष्ट्रपती निवडणुकीमध्ये विजय मिळवला होता. लाई चिंग आणि त्यांचा पक्ष डीपीटी ही चीनची कट्टर विरोधी मानली जाते. लाई चिंत ते च्या विजयासोबतच त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाने सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवत इतिहास रचला आहे.