जिनिव्हा: जगातील कोरोना बाधितांचा आकडा पावणे दोन कोटींच्या पुढे गेला आहे. तर मृतांचा आकडा ७ लाखांच्या जवळपास पोहोचला आहे. सध्याच्या घडीला जगभरात कोरोनावरील लस शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही मोजक्या लसींच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यात कोरोनावरील लस बाजारात येईल, अशी आशा वाटू लागली आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस ऍडनम यांच्या एका विधानामुळे कोरोनावरील लस आली तरी कोरोना पूर्णपणे हद्दपार होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोरोनावरील रामबाण उपाय कदाचित कधीच सापडणार नाही, असं ऍडनम एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हणाले. भारतात कोरोनाचा संक्रमणाचा वेग अतिशय जास्त आहे. त्यामुळे त्यांना कोरोनाविरोधात मोठा लढा द्यावा लागेल, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला. 'कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुरळीत होण्यासाठी बराच वेळ लागेल. तीन महिन्यांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीची बैठक झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येत पाच पटीनं वाढ झाली आहे. तर मृतांचा आकडा तिपटीनं वाढला आहे,' अशी आकडेवारी ऍडनम यांनी सांगितली.टेड्रोस ऍडनम आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीचे प्रमुख माईक रायन यांनी सर्व देशांना कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं. मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, हात स्वच्छ करा आणि कोरोना चाचण्या करा, असं आवाहन त्यांनी केलं. लोकांनी मास्कचा आवर्जून वापर करावा. मास्क वापरणं म्हणजे लोकांच्या एकजुटतेचं प्रतीक व्हावं, असं टेड्रोस म्हणाले.सध्याच्या घडीला कोरोनावरील बहुतांश लसी तिसऱ्या टप्प्यात आहेत. त्यांच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. कोरोना विषाणूवरील लस लवकरच उपलब्ध होईल, अशी आम्हाला आशा आहे. मात्र सध्या तरी कोणताही रामबाण उपाय दिसत नाही आणि तसा उपाय कधी सापडेल, असं वाटत नाही, अशी भीती शब्दांत टेड्रोस यांनी व्यक्त केली. भारत आणि ब्राझीलमध्ये कोरोना संक्रमणाचा वेग अतिशय जास्त आहे. त्यामुळे त्यांना मोठा संघर्ष करावा लागेल. यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, असं ते म्हणाले.
CoronaVirus News: WHO प्रमुखांच्या एका विधानानं जगाचं टेन्शन वाढलं; भारताला धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 7:56 PM