न्यूयॉर्क, दि. 19 - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला ‘पूर्णपणे नष्ट’ करण्याचा आणि शस्त्रास्त्रे कार्यक्रमावरून इराणच्या प्राणघातक राजवटीशी संघर्ष करण्याचा अत्यंत कठोर इशारा मंगळवारी दिला. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कडक भाषा वापरलेल्या भाषणात उत्तर कोरियाला अणू क्षेपणास्त्रांचा कार्यक्रम सुरू न ठेवण्याचा इशारा दिला. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-ऊन यांचा उल्लेख ‘रॉकेट मॅन’ असा करून त्याचा देश नष्ट करण्याची धमकी दिली.
‘अमेरिकेकडे प्रचंड शक्ती आणि संयम आहे; परंतु आम्हाला स्वत:चे व किंवा आमच्या मित्रदेशांचे संरक्षण करणे भाग पडले तर उत्तर कोरियाला पूर्णपणे नष्ट करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग नसेल,’ असे ट्रम्प म्हणाले. रॉकेट मॅन हा स्वत:च्या आणि त्याच्या राजवटीच्या आत्मघाती मोहिमेवर आहे, असे सांगून ट्रम्प म्हणाले की, ‘अमेरिका तयार आहे, तिची तयारी आणि ती सक्षम आहे; परंतु आशा आहे की, या सगळ्याची गरज भासणार नाही.’
ट्रम्प यांनी जगातील सहा मोठे देश आणि इराण यांच्यात २०१५ मध्ये झालेल्या अणू कराराला फाडून टाकण्याचा मार्गच जणू मोकळा करून दिला. ट्रम्प म्हणाले, ‘मध्य पूर्वेतील संघर्षात इराणच्या विध्वंसक भूमिकेला आवर घालण्यात हा करार अपयशी ठरला आहे.’ पुढील महिन्यात ट्रम्प काँग्रेसला अहवाल सादर करतील त्यावेळी इराणने कराराचे उल्लंघन केले, असे ते जाहीर करण्याचा त्यांचा हेतू असल्याचे स्पष्ट संकेत दिले. ‘प्राणघातक राजवटीला आम्ही घातक क्षेपणास्त्रे उभारण्यास देऊन त्यांच्या अस्थिरतेच्या कारवायांना सुरू ठेवू देऊ शकत नाही आणि संभाव्य अणू कार्यक्रमाला ही राजवट संरक्षण देणार असेल तर आम्ही या कराराला बांधील राहू शकत नाहीत,’ असेही ट्रम्प म्हणाले. अगदी मोकळेपणे सांगायचे तर तो करार अमेरिकेसाठी बेचैन करणारा असून, त्याच्याबद्दल तुम्हाला काही ऐकायला मिळाले असेल, असे मला वाटत नाही,’ असेही ते म्हणाले.