बंगळुरू/नवी दिल्ली : कनिष्ठ कर्मचाऱ्यांकरिता अमेरिकेच्या एच-१बी व्हिसासाठी अर्जच न करण्याचा निर्णय इन्फोसिसने घेतला आहे. अमेरिकेने व्हिसा नियम कडक केल्यामुळे हा निर्णय कंपनीने घेतला. इन्फोसिस कामकाजी व्हिसावरच प्राधान्याने अवलंबून आहे. अमेरिकेच्या सुरक्षावादी धोरणामुळे व्हिसा मिळणे अवघड झाल्यामुळे कंपनीला आपल्या धोरणांत बदल करावा लागला आहे. कंपनीच्या एका कार्यकारी अधिकाऱ्याने सांगितले की, ४ वर्षांपेक्षा कमी अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आम्ही व्हिसा मागणार नाही. या पातळीवरील काम आऊटसोर्स करून भारतातून पूर्ण करून दिले जाईल. आमच्या ग्राहकांशी तशी बोलणी आम्ही करीत आहोत.अन्य एका कार्यकारी अधिकाऱ्याने सांगितले की, सिस्टिम इंजिनीअर आणि सिनियर सिस्टिम इंजिनीअर यांच्यासाठी व्हिसा न मागण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ही कंपनीतील सर्वांत कनिष्ठ पदे आहेत. अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेत रोजगाराची गरज आहे. तरीही तेथील कंपन्या यंदा कमी व्हिसा मागत आहेत. आमच्या काही ग्राहकांनीच ही माहिती आम्हाला दिली. (वृत्तसंस्था)
कनिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी अमेरिकी व्हिसा नाही
By admin | Published: March 24, 2017 12:41 AM