लास वेगस - एफबीआयने अमेरिकेतील लास वेगासमध्ये म्युझिक कॉन्सर्टदरम्यान झालेल्या गोळीबाराचा दहशतवादाशी काही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. इसिसने हल्ल्याची जबाबदारी घेत आपल्याच दहशतवाद्याने गोळीबार केल्याचं जाहीर केलं होतं. मात्र एफबीआयने या हल्ल्यामागे इसिसचा हात असल्याची शक्यता नाकारली आहे. दुसरकीडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी केलेले हे कृत्य असल्याचं म्हटलं आहे.
लास वेगासमध्ये सोमवारी टोलेजंग इमारतीच्या ३२व्या मजल्यावरून खुल्या मैदानातील खचाखच भरलेल्या संगीत महोत्सवावर एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारात तब्बल ५८ जण ठार झाले. या हल्ल्याने लास वेगससारखे पर्यटकांचे हब हादरले असून, संपूर्ण अमेरिकेलाही याचा धक्का बसला आहे. हल्ल्यात 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
एफबीआयच्या एका स्पेशल एजंटने सांगितलं आहे की, लास वेगासमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये कोणत्याही दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं समोर आलेलं नाही. इसिसने हल्ल्याची जबाबदारी घेत हल्लेखोराने काही दिवसांपुर्वीच इस्लाम धर्म स्विकारला असल्याचा दावा केला होता.
लास वेगास बुलेवर्ड म्हणून ओळखल्या जाणा-या या भागातील हमरस्त्याच्या एका बाजूला एमजीएम रिसॉर्ट्स इंटरनॅशनल या कंपनीची ‘मंडाले बे हॉटेल अँड कसिनो’ची ४५ मजली टोलेजंग इमारत आहे. त्याच्या बरोबर समोर रस्त्याच्या दुस-या बाजूला याच कंपनीचे विविध मनोरंजन कार्यक्रमांसाठी भाड्याने दिले जाणारे खुल्या मैदानातील प्रेक्षागार आहे. हा संगीत महोत्सव याच खुल्या मैदानात सुरु होता. सर्वात भयावह गोष्ट अशी की समोरच्या ‘मंडाले बे हॉटेल’च्या ब-याच वरच्या मजल्यावरून खाली मैदानात सुरू असलेल्या संगीत महोत्सवाच्या श्रोत्यांवर हल्लेखोराने हा गोळीबार केला.
रात्रीच्या काळोखात हॉटेलच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून येणा-या बंदुकीच्या गोळ्यांच्या प्रकाशशलाका प्रत्यक्षदर्शींनी पाहिल्या. त्यामुळे घटनेनंतर काही मिनिटांतच तेथे दाखल झालेल्या पोलिसांच्या विशेष ‘स्वॅट’ पथकाने सरळ मोर्चा हॉटेलकडे वळविला. ३२ व्या मजल्यावर हल्लेखोर सापडला व तेथेच त्यास ठार मारण्यात आले, असे पोलिसांनी सुरुवातीस सांगितले. मात्र नंतर त्याने आत्महत्या केल्याचे वृत्त अमेरिकी प्रसिद्धी माध्यमांनी दिले.
स्टिफन पॅडॉक असे या ६४ वर्षांच्या हल्लेखोराचे नाव असून तो लास वेगसपासून ८० मैलावर नेवादा राज्यातील मेस्क्विट येथील रहिवासी होता. वाहतूक नियम मोडल्याच्या किरकोळ गुन्ह्यांखेरीज त्याच्या अन्य कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीची पोलिसांच्या दफ्तरी नोंद नाही. हॉटेलमधील हल्लेखोराच्या खोलीत आठ स्वचलित रायफलींसह एकूण १० शस्त्रे मिळाली. त्यांतून शेकडो गोळ््या झाडल्या गेल्या होत्या. हल्लेखोराचा नेमका हेतू लगेच स्पष्ट झाला नसला तरी तो एकटाच होता व त्याचा कोणत्याही संघटित टोळीशी किंवा दहशतवादी संघटनेशी संबंध नसावा, असा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे. हॉटेलमधील नोंदीनुसार हल्लेखोरासोबत मेरी लाऊडॅनली नावाची आशियाई वंशाची महिला राहात होती. तिचा शोध सुरू आहे. याखेरीज पोलिसांनी दोन संशयित मोटारी ताब्यात घेतल्या असून त्यापैकी एका मोटारीचा रजिस्ट्रेशन नंबर पर्यटकांसाठी दिला जाणारा आहे.