नवी दिल्ली - परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या एअर स्ट्राईकबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. बालाकोटच्या कारवाईत एकाही पाकिस्तानी सैन्याचा किंवा नागरिकाचा मृत्यू झाला नसल्याचे स्वराज यांनी स्पष्ट केलंय. अहमदाबाद येथे भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना स्वराज यांनी हे बाब स्पष्ट केली. त्यानंतर, पाकिस्तानने यावर प्रतिक्रिया देत, अखेर सत्य समोर आलेच, असे म्हटले आहे.
भारताने पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर 26 फ्रेब्रुवारी रोजी एअर स्ट्राईक केला होता. जैश ए मोहम्मदकडून 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला आणि स्व-संरक्षणासाठी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केल्याचं भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर सांगितलं आहे. तसेच या कारवाईत कुठल्याही पाकिस्तानी नागरिकांचा आणि सैन्याचा मृत्यू झाला नसल्याचे सुषमा स्वराज यांनी सांगितलं आहे. सुषमा स्वराज यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अखेर सत्य समोर आलेच, त्याचप्रमाणे 2016 मधील सर्जिकल स्ट्राईकचे सत्य समोर येईल. तसेच, पाकिस्तानच्या दोन विमानांना पाडण्यात आल्याचे आणि एफ 16 बाबतही लवकरच सत्य बाहेर येईल, असा खोचक टोला पाकिस्तानने लगावला आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैन्याचं लक्ष्य केवळ जैश ए मोहम्मदच्या लष्करी तळावर हल्ला करणे हेच होते. त्यामुळेच, या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्य किंवा नागरिक ठार मारला जाणार नाही, याची काळजी भारताने घेतली होती. त्यामुळेच जगभरातील देशांनी भारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या कारवाईचं समर्थन केलं आहे. दरम्यान, या मेळाव्यात बोलताना, देशाला बहुमताच्या सरकारची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं.