नवी दिल्ली, दि. 18- बार्सिलोनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कुणीही भारतीय व्यक्ती जखमी झाला नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. सुषमा स्वराज यांनी ट्विट करून ही माहिती दिली. तसंच स्पेनमधील भारतीय दुतावासाच्या सतत संपर्कात असल्याचंही सुषमा स्वराज यांनी सांगितलं आहे. भारतीय दुतावासाने ट्विट केलेले बार्सिलोनातील इमर्जन्सी फोन नंबर सुषमा स्वराज यांनी रिट्विट केले आहेत.
'स्पेनमधील भारतीय दुतावासाच्या मी सतत संपर्कात आहे. स्पेनमधील त्या दहशतवादी हल्ल्यात आत्तापर्यंत कुठलाही भारतीय दगावल्याची माहिती समोर आलेली नाही', असं ट्विट सुषमा स्वराज यांनी केलं आहे.
स्पेनमधील बार्सिलोना शहराला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे. दहशतवाद्यांनी लास रॅमब्लास या गर्दीच्या रस्त्यावर भरधाव वाहनानं अनेकांना चिरडल्यानंतर अंदाधुंद गोळीबारही केला आहे. यात 13 जणांचा मृत्यू झाला असून, 100हून अधिक लोक जखमी आहेत. वाहनाच्या धडकेत अनेक जण गंभीररीत्या जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्पेन पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. इसिस या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बार्सिलोनातील लास रॅमब्लासमध्ये पदपथावर अनेक जण उपस्थित असतानाच एक व्हॅनने काही लोकांना चिरडलं आहे. अचानक झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानं सिटी सेंटरच्या बाहेर रस्त्यावर लोकांची तारांबळ उडाली आणि रस्त्यावर लोक अस्ताव्यस्त पळत सुटले. घटनास्थळावर पोलीस दाखल झाले असून, ते परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम करत आहेत.
आणखी वाचा स्पेनमध्ये दहशतवादी हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू, इसिसनं स्वीकारली जबाबदारीअमरनाथ दहशतवादी हल्ला निंदनीय - अमेरिका
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला निषेधअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. तर दहशतवादाविरोधात आम्ही स्पेनसोबत असल्याचं विधान इंग्लंडच्या पंतप्रधान टेरेसा मे यांनी केलं आहे.
स्पेनच्या कॅम्ब्रिल्समध्येही हल्ल्याचा प्रयत्न, पाच दहशतवादी ठारस्पेनच्या बार्सिलोना शहरातील रॅमब्लास येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कॅम्ब्रिल्स येथेही व्हॅन गर्दीत घुसवून दहशतवादी हल्ल्याचा दुसरा प्रयत्न झाला. पण सर्तक असलेल्या पोलिसांनी वेळीच या हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच दहशतवादी ठार झाले.
दुस-या हल्ल्यात सहा नागरीक आणि एक पोलिस अधिकारी जखमी झाला आहे. व्हॅनमधील पाचव्या हल्लेखोराला जखमी झाल्यानंतर ताब्यात घेण्यात आले होते पण त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असे स्पॅनिश पोलिसांनी सांगितले. कॅमब्रिल्स येथे गर्दीत गाडी घुसवणा-या हल्लेखोरांनी अंगाला स्फोटकांनी भरलेला पट्टा बांधला होता. रॅमब्लास सारखी इथेही हल्लेखोरांनी गर्दीत गाडी घुसवली असे कॅटालान इर्मजन्सी सर्व्हिसेसकडून सांगण्यात आलं.