नवी दिल्ली - जम्मू काश्मीर मुद्द्यावरून पुन्हा एकदा पाकिस्तानला झटका बसला आहे. जम्मू काश्मीरातून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या मुद्द्यावरून पाकिस्तानला चीनशिवाय कोणत्याही देशाने पाठिंबा दिला नाही. अलीकडेच पाकिस्तानने जम्मू काश्मीर प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात घेऊन जाणार असल्याचं सांगितलं मात्र तिथेही पाकिस्तानच्या पदरी निराशा पडणार असल्याचं खुद्द पाकिस्तानच्या वकिलांनी सांगितलं आहे.
आंतरराष्ट्रीय कोर्टातील पाकिस्तानचे वकील खावर कुरैशी यांनी सांगितले आहे की, जम्मू काश्मीरमध्ये जर हिंसाचार होत असेल तर त्याचे पुरावे गोळा करणे कठिण आहे. जर भारताविरोधात पुरावे नसतील तर पाकिस्तानला जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर अनेक अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने या प्रकरणावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदमध्ये आवाज उचलला होता. मात्र त्याठिकाणीही पाकिस्तानला तोंडघशी पडावं लागलं. त्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी काश्मीर मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याचं सांगितलं होतं.
पाकच्या मंत्र्यांपासून ते पंतप्रधान इम्रान खान यांच्यापर्यंत अनेकजण भारतासोबत युद्धाची भाषा बोलू लागलेत. तर जगाने काश्मीरकडे लक्ष दिले नाही तर भारत-पाक युद्धाचे परिणाम जगाला भोगावे लागतील अशा पोकळ धमक्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देत आहेत. एकंदर या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर सतर्क असून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत सज्ज आहे असा संदेश भारतीय लष्कराकडून दिला जात आहे. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जवानांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाकच्या नापाक हरकती रोखण्यासाठी जवानांना मार्गदर्शन केले होते.
भारताने नुकताच जम्मू आणि काश्मीरचेकलम 370 रद्द करत विशेष दर्जा काढून घेतला आहे. यावरून पाकिस्तानचा जळफळाट झाला असून प्रत्येक दिवशी त्यांच्याकडून चिथावणीखोर वक्तव्ये केली जात होती. यामुळे दोन्ही देशांदरम्यान तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभुमीवर पोखरण येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत प्रथम अण्वस्त्रे वापरणार नसल्याचे म्हटले होते. यावरून पाकिस्तानने त्यांचे वक्तव्य युद्धाला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला होता.
काश्मीरमध्ये मुस्लिमांवर अन्याय होत असताना जगातील सर्व देश मौन बाळगतात. सर्व जगाला माहित आहे की, काश्मीरात काय परिस्थिती आहे. काश्मीरात मुस्लीम नसते तर सर्व जग त्यांच्यामागे उभं राहिलं असतं. काश्मीर कठीण संकटातून जात आहे असा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला होता.