ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 14 - भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या विजय माल्ल्याला भारत सोडावा लागल्याबद्दल अजिबात खंत वाटत नाही. ब्रिटनमध्ये विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पण खटल्याची सुनावणी सुरु असताना माल्ल्या मात्र ऐषो आरामी आयुष्य जगत आहे. भारताने ब्रिटनकडे विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. विजय माल्ल्याला सुनावणीसाठी कोर्टात हजर रहावे लागते, त्याच्या प्रवासावर काही निर्बंध आहेत तरी, माल्ल्या ब्रिटनमध्ये सोशल लाईफ आनंदात जगत आहे.
क्रिकेटच्या मॅचपासून ते घोडयांच्या शर्यतीपर्यंत माल्ल्याची ब्रिटनमध्ये प्रत्येक ठिकाणी उपस्थिती असते. बुधवारी माल्ल्या लंडनमध्ये फॉर्म्युला वनच्या एका कार्यक्रमाला हजर होता. त्यावेळी माल्ल्याला तुम्हाला भारताची आठवण येते का ? असा प्रश्न विचारला त्यावर त्याने आठवण्यासारखे काही नाही असे उत्तर दिले.
माझे सर्व कुटुंबिय इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये रहतात. माझ्या सावत्र भावंडांबद्दल म्हणाला तर त्यांच्याकडे यूकेचे नागरीकत्व आहे. त्यामुळे भारतामध्ये मिस करण्यासारखे फारसे काही नाही असे उत्तर त्याने दिले. विजय माल्ल्यावर भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. किंगफिशर एअरलाईन्स या कंपनीसाठी त्याने हे कर्ज घेतले होते. पण माल्ल्याने त्याच्यावरचे हे आरोप फेटाळून लावलेत.
आणखी वाचा
मी काहीही चुकीचे केलेले नाही. खटला ब्रिटनच्या न्यायालयात चालू आहे त्याचा मला आनंद आहे. कारण इथे निष्पक्ष सुनावणी होईल. त्यामुळे काय निकाल लागतो ते लवकरच कळेल असे त्याने सांगितले. मी ब्रिटनमध्ये रहाण्याचा आनंद घेतोय. इथे पाहुणे तसेच प्रायोजकांना भेटतो. सर्व काही आनंदात सुरु आहे असे माल्ल्याने सांगितले.
विजय माल्ल्याने दशकभरापूर्वी जॉडर्नचा फॉर्म्युला वनचा संघ विकत घेऊन फोर्स इंडिया असे नामकरण केले. आता फॉर्म्युला वनच्या संघासाठी नवीन प्रायोजक मिळवण्यासाठी इंडिया हे नाव काढण्यावर चर्चा सुरु आहे. दरम्यान ब्रिटनच्या कोर्टात 4 डिसेंबरपासून विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पण खटल्याची नियमित सुनावणी सुरु होईल. भारतातही त्याच्यावर अनेक खटले दाखल आहेत.