लाहोर : माझ्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. माझ्या हत्येचा वझिराबाद (पंजाब प्रांतातील) किंवा पाकिस्तानातील गुजरातमध्ये ठार मारण्याचा त्यांचा कट होता हे मला एक दिवस आधी कळले होते, असे वक्तव्य गुरुवारी हत्येचा प्रयत्न झाल्यानंतर प्रथमच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे.
माझ्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. इम्रान खान यांच्या उजव्या पायात घुसलेल्या चार गोळ्या लाहोर येथील शौकत खानम रुग्णालयात शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आल्या. इम्रान खान यांनी सांगितले की, माझी हत्या करण्याच्या झालेल्या प्रयत्नाबद्दल लवकरच सविस्तर बोलणार आहे.
इम्रान खान यांनी हल्ल्याबद्दल तीन जणांवर संशय व्यक्त केला असून, पाक सैन्याला लाँग मार्च नको होता, असा दावा केला आहे. इम्रान खान यांनी देशात पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला निवडणुका घ्याव्यात आणि नव्या सरकारच्या प्रमुखालाच लष्करप्रमुख ठरविण्याचा अधिकार द्यावा, या दोन मागण्या केल्या आहेत.
झुकणार नाही...
जखमी इम्रान यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांनी निषेध मोर्चा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ‘मी झुकणार नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे. या हल्ल्यानंतर पंजाब प्रांतातील पोलीस अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
कुणावर आहे संशय?
पीटीआयचे नेते असद उमर आणि मिलन अस्मल इक्बाल यांनी निवेदन जारी करून पंतप्रधान शाहबाज शरीफ, गृहमंत्री राणा सनाउल्ला आणि आयएसआयचे मेजर जनरल फैसल यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.