बीजिंग - गेल्या काही दिवसांपासून चीनच्या अनेक भागात भयंकर दुष्काळ पडला आहे. देशातील ५० हून अधिक नद्या कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे दुष्काळापासून दिलासा मिळवण्यासाठी आर्टिफिशियल पाऊस पाडण्याचा विचार सुरू आहे. यादरम्यान, दुष्काळामुळे आटलेल्या एका नदीमधून ६०० वर्षे जुना खजिना समोर आला आहे. आटलेल्या नदीपात्रात तीन प्राचीन मूर्ती सापडल्या आहेत. या मूर्ती गौतम बुद्धांच्या आहेत.
स्टेट मीडिया जिनहुआच्या एका रिपोर्टनुसार यांग्झी नदी कोरडी पडत आहे. त्यामुळे चीनमधील दक्षिण-पश्चिमेस असलेल्या चोंगक्विनमधील एक बेट जे आधी बुडालेले होते ते आता पाण्याबाहेर आले आहे. त्याबरोबरच भगवान गौतम बुद्धांच्या तीन मूर्तीही समोर आल्या आहेत.
या तिन्ही मूर्ती बेटावरील सर्वात वरच्या खडकांवर होत्या. या बेटाचं नाव फोएलियांग असं आहे. या मूर्तींबाबत सांगण्यात येत आहे की, या मूर्ती मिंग आणि किंग साम्राज्यादरम्यान बनवण्यात आल्या होत्या. यामधील एका मूर्तीमध्ये कमलासनावर विराजमान झालेल्या भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आहे.
चीनमधील दक्षिण-पश्चिम भागात दुष्काळामुळे यांग्झी नदीच्या पाण्याचा स्तर वेगाने कमी होत चालला आहे. जुलै महिन्यापासून आतापर्यंत यांग्झी नदीच्या परिसरात सामान्यापेक्षा ४५ टक्के कमी पाऊस पडला आहे. हवामानाच्या अधिकृत अंदाजानुसार पुढच्या आठवड्यापर्यंत भीषण पाऊस पडत राहण्याची शक्यता आहे.