वॉशिंग्टन : सूर्यमालेत सूर्यापूर्वी पाणी अस्तित्वात होते असे सूर्यमालेच्या निर्मितीचे गूढ उकलण्यात व्यग्र असलेल्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की विश्वात सर्वांत आधी काय अस्तित्वात आले? सूर्य, पाणी, पृथ्वी, आकाश की आणखी काही?
एका ताऱ्याच्या चकतीवर संशोधन केले असता सूर्यमालेतील पाण्याची उत्पत्ती सूर्याच्या निर्मितीपूर्वी झाली असल्याचे आढळले. व्ही ८८३ ओरियोनिस असे या ताऱ्याचे नाव असून, तो पृथ्वीपासून १,३०० प्रकाशवर्षे दूर आहे. अभ्यासांती समजले की, तेथे पाणी वायूच्या रूपात आहे. वायू आणि धुळीपासून बनलेले ढग फुटतात तेव्हा एक तारा तयार होतो. ताऱ्याभोवती या ढगाची चकती तयार होते. व्ही८८३ ओरियोनिसच्या चकतीत सापडलेल्या पाण्यात काही रसायने आहेत. पृथ्वीवरील पाणी सूर्यापेक्षा जुने आहे, या सिद्धांताला यामुळे पाठबळ मिळते, असे शास्त्रज्ञ जॉन जे. टोबिन यांनी सांगितले.
धूमकेतूने आणले पृथ्वीवर पाणी
- सूर्यमालेतील काही धूमकेतूंवरील पाणी पृथ्वीवरील पाण्यासारखेच आहे. यावरून धूमकेतूंद्वारे पाणी पृथ्वीवर पोहोचल्याचे दिसते.
- व्ही८८३ओरियोनिसच्या चकतीतील पाण्याची रचना सूर्यमालेतील धूमकेतूंसारखीच आहे. यावरून असे म्हणता येते की, कोट्यवधी वर्षांपूर्वी पाण्याची निर्मिती झाली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"