लंडनः ब्रिटिश संसदेचं कनिष्ठ सभागृह असलेल्या 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये पंतप्रधान थेरेसा मे यांच्या ब्रेक्झिट करारावर मतदान झालं. ज्यात पुन्हा एकदा त्यांचा पराभव झाला. ब्रिटिश संसदेत पंतप्रधान थेरेसा यांचा 391 विरुद्ध 242 मतांनी हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. जानेवारी महिन्यातही ब्रिटिश संसदेनं ब्रेक्झिट कराराविरोधात मतदान केलं होतं. त्यामुळे पंतप्रधान थेरेसा मे यांना मोठा झटका बसला होता. ब्रेक्झिट कराराविरोधात तब्बल 432 सदस्यांनी मतदान केलं होतं. तर 202 सदस्यांनी ब्रेक्झिटच्या बाजूनं कौल दिला होता. त्यामुळे ब्रिटनला युरोपियन युनियनपासून दूर होण्यास आणखी कालावधी लागू शकतो. ब्रिटननं युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी 29 मार्चपर्यंतची मुदत निश्चित केली होती. मात्र ब्रेक्झिटबद्दलचा प्रस्ताव ब्रिटिश संसदेनं संमत केलेला नाही. त्यामुळे ब्रेक्झिटला आणखी काही काळ लागू शकतो. यासाठी आता ब्रिटनकडून युरोपियन युनियनकडे मुदतवाढ मागितली जाण्याची शक्यता आहे. संसदेतील मतदानाआधीच पंतप्रधान थेरेसा मे यांना अपयशाची भीती सतावत होती. मे यांच्या पक्षातील अनेकांच्या मनात ब्रेक्झिट कराराबद्दल नाराजी आहे.युरोपियन युनियनमधून बाहेर पडावं की नाही, याबद्दल 23 जून 2016 रोजी ब्रिटनमध्ये जनमताचा कौल घेण्यात आला. त्यात 51.9 टक्के लोकांनी बाहेर पडण्याच्या बाजूनं मत नोंदवलं. तेव्हापासून ब्रेक्झिटची प्रक्रिया सुरू झाली. गेल्या डिसेंबरमध्ये ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहात (हाऊस ऑफ कॉमन्स) या संदर्भात मतदान होणार होतं. मात्र पराभवाच्या भीतीनं पंतप्रधान मे यांनी मतदान पुढे ढकललं. यानंतर विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बेन यांनी पंतप्रधान मे यांना लक्ष्य केलं. खासदारांच्या शंका दूर करण्यात पंतप्रधानांना पूर्णपणे अपयश आल्याची टीका कॉर्बेन यांनी केली होती.
थेरेसा मे यांना दुसऱ्यांदा धक्का, 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये ब्रेक्झिट करार नामंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 9:17 AM