ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २२ - अंतराळवीरांना जास्तीत जास्त आरामदायक आणि सर्वसुविधा असलेले स्पेससूट उपलब्ध व्हावेत यासाठी अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नासा'ने स्पर्धा आयोजित केली होती. डॉ. थॅचर कॉर्डन यांनी तयार केलेला आरामदायी स्पेससूट या स्पर्धेत अव्वल ठरला असून त्यासाठी त्यांना १० लाखांचे बक्षिस देण्यात आले.
अंतराळयानामध्ये प्रवास करताना वैज्ञानिकांसमोर सर्वात महत्वाचे आव्हान असतं ते म्हणजे मलमूत्र विसर्जनाचे. त्यासाठी वैज्ञानिकांना १२-१२ तास थांबावं लागे किंवा डायपरचा वापर करावा लागे. कधीकधी उपाशीही राहावं लागत असे. पण डॉ. थॅचर कॉर्डननी केलेल्या सूटमुळे यामधील ब-याचशा कटकटी कमी झाल्या आहेत. डॉ. कॉर्डन हे ४९ वर्षिय फिजिशियन असून ते टेक्ससमध्ये राहतात. अमेरिकन वायूदलासाठी ते डॉक्टर म्हणून काम करतात.
अंतराळवीरांसाठी हा स्पेससूट तयार करताना त्यांनी आपल्या आजूबाजूस आढळणा-या वस्तूंचाच उपयोग केला. त्यामध्ये रबरी, प्लास्टीकच्या नळ्या, बाटल्या, स्प्रिंग यांचा वापर केला आहे. या सूटचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये त्यांनी एक एअर लॉक बसवले असून झडपांचाही वापर केला आहे. यामुळे मलमूत्र स्पेससूटमधून बाहेर काढता येणार आहे. स्पेससूट पूर्णपणे स्वच्छ राहात असल्यामुळे डॉ. कॉर्डन यांच्या शोधाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
(अंडरवेअर डिजाईनसाठी 6 लाखांचं बक्षिस)
निवडण्यात आलेल्या डिजाईन्सना वेगवेगळ्या विभागांमध्ये 20 लाखांचं बक्षिस देण्यात आलं आहे. या नव्याने डिजाइन्स करण्यात आलेल्या कपड्यांमध्ये अंतराळवीरांकडून वापरण्यात येणारा स्पेससूट्स जास्तीत जास्त आरामदायक बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
10 लाखांचं पहिलं बक्षिस डॉक्टर कार्डन यांना तर 'टीम स्पेस पूप यूनिफिकेशन ऑफ डॉक्टर्स'ना त्यांच्या 'एअर पावर्ड स्पेससूट वेस्ट डिस्पोजल सिस्टम' डिजाइनसाठी दुसरा क्रमांक आणि 6 लाख 70 हजाराचं बक्षिस देण्यात आलं. ब्रिटनच्या हुगो शेले यांनी डिजाईन केलेल्या 'स्विमसूट झीरो ग्रॅव्हिटी अंडरवेअर फॉर 6-डे यूज'साठी 3 लाख 35 हजारांचे बक्षिस देण्यात आले.