ऑनलाइन लोकमत
टोक्यो, दि. १५ - बारमध्ये जाणारे अनेकजण अमुक एक ड्रिंक करायचे असे ठरवून जातात किंवा प्रत्येकाचा एक ठरलेला ब्राण्ड असतो. पण कॉकटेल नजरेस पडल्यानंतर अनेकांचा ठरवलेला मनसुबा बदलतो. कारण कॉकटेलच्या आकर्षक सजावटीमुळे त्याची टेस्ट घेण्याची इच्छा मनात निर्माण होते.
कॉकटेलचे वेगवेगळे प्रकार असून, जगातल्या काही महागडया बारमध्ये आता कॉकटेलमध्ये सोनेही मिसळून देतात. पण त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. सिंगापूरपासून इस्तांबुलपर्यंतच्या काही बारमध्ये कॉकटेलच्या एका ड्रींकची किंमत तुमच्या गाडीपेक्षाही जास्त आहे.
सिंगापूरच्या पानगाइआ क्लबमध्ये मिळणा-या एका कॉकटेल ड्रींकची किंमत ३५ हजार डॉलर आहे. या ड्रिंकमध्ये सोन्याचे कण मिसळलेले असतात. टोक्योच्या रिटझ कार्लटॉन हॉटेलमध्ये कॉकेटेलच्या एका ड्रिंकची किंमत १५ हजार डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त आहे. इथे कॉकटेलमध्ये ग्लासच्या तळाशी एक हिरा असतो. हिरा असलेले कॉकटेल ऑर्डर करणा-यांसाठी इथे खास डायमंड आर फॉरेव्हरचे संगीत वाजवले जाते. २००७ मध्ये हॉटेल सुरु झाल्यापासून आतापर्यंत चार जणांनी या कॉकटेलचा अस्वाद घेतला आहे.
इस्तांबुलच्या सिरागान पॅलेस केमपिनस्कीमध्ये कॉकटेलमध्ये सोन्याची पाने मिसळून दिली जातात. नोव्हेंबर ते मार्च या महिन्यातच हे ड्रींक मिळते म्हणून याला विंटर कॉकटेल म्हणतात. या कॉकटेलची किंमत ६८० डॉलर आहे.