Israel news: "सर्व सुसंस्कृत राष्ट्रांनी इस्रायलच्या सोबत मजबूतपणे उभे राहिले पाहिजे, कारण आम्ही इराणच्या नेतृत्वाखाली क्रूर शक्तीशी लढत आहोत", असे आवाहन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केले. यावेळी त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी घेतलेल्या निर्णयावर सडकून टीका केली. इस्रायलला शस्त्र पुरवठा न करण्याचा फ्रान्सचा निर्णय लाजीरवाणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शनिवारी (५ ऑक्टोबर) एक व्हिडीओ संदेश जारी केला. "दहशतवादी एकजुटीने उभे आहेत. पण, जे देश या कथित दहशतवादी राष्ट्रांचा विरोध करतात, ते इस्रायलवर शस्त्र बंदी लावण्याचे आवाहन करत आहे", असे नेतन्याहू म्हणाले.
त्यांना लाज वाटली पाहिजे-नेतन्याहूंची मॅक्रॉन यांच्यावर संतापले
नेतन्याहू म्हणाले, "अशा वेळी जेव्हा इस्रायल इराणच्या नेतृत्वाखालील क्रूर शक्तींशी लढत आहे, सर्व सुसंस्कृत देशांनी इस्रायलच्या सोबत उभे राहायला हवे. तरीही राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि अन्य पाश्चिमात्य नेते आता इस्रायलवर शस्त्र बंदी लावण्याची मागणी करत आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे. इराण हिज्बुल्लाह, हुती, हमास आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांवर शस्त्रबंदी लावत आहे का? तर अजिबात नाही. दहशतवादी राष्ट्रे एकजुटीने उभे आहेत, पण जे देश कथितपणे या दहशतवादी राष्ट्रांचा विरोध करतात, ते आता इस्रायलवर शस्त्रबंदी लावण्याची मागणी करत आहेत. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे", असा संताप नेतन्याहू यांनी फ्रान्सच्या निर्णयानंतर व्यक्त केला.
"...तर फ्रान्स इस्रायलच्या सोबत उभा असेन"
नेतन्याहू यांनी केलेल्या टीकेनंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या कार्यालयाकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, फ्रान्स आणि इस्रायल चांगले मित्र आहेत आणि इस्रायलच्या सुरक्षेला पाठिंबा देतो. जर इराण किंवा त्याच्या समर्थकांनी इस्रायलवर हल्ला केला, तर फ्रान्स नेहमी इस्रायलच्या सोबत उभा असेन."