काठमांडू : शनिवारी रात्री कडाक्याची थंडी असूनही नेपाळच्या वायव्य भागातील डोंगराळ गावांमधील हजारो लोकांना भूकंपामुळे बाहेर रस्त्यावर कुडकुडत झोपावे लागले. नेपाळमधीलभूकंपात किमान १५७ नागरिकांचा मृत्यू झाला असून, मोठ्या संख्येने घरांचे नुकसान झाले.
नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री अचानक आलेल्या भूकंपामुळे हजारो घरांचे नुकसान झाले आहे. चिउरी गावातील रहिवासी लाल बहादूर बिका यांनी भूकंपात ठार झालेल्या १३ लोकांच्या पांढऱ्या कपड्यांमध्ये गुंडाळलेल्या मृतदेहांकडे बोट दाखवत सांगितले, आम्ही आमच्या गावांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची वाट पाहत आहोत आणि जखमी लोकांची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे.
रात्री लोकांनी प्लास्टिकच्या चादरी आणि जुने कपडे वापरले. घरांच्या ढिगाऱ्याखालून सामान बाहेर काढता येत नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. सरकारने मदतीसाठी तंबू, अन्न आणि औषधे पाठविली आहेत.
माझे अर्धे शरीर ढिगाऱ्याखाली गेले...- रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींपैकी बिमल कुमार कार्की म्हणाले की, मी गाढ झोपेत होतो तेव्हा अचानक सर्व काही भयानकपणे थरथर कापू लागले. मी पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण माझे संपूर्ण घर कोसळले. - मी पळण्याचा प्रयत्न केला; पण माझे अर्धे शरीर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. कार्की म्हणाले की, मी ओरडलो, पण माझे शेजारी घरांमध्येही सारखीच स्थिती होती आणि मदतीसाठी लोक ओरडत होते. बचाव कर्मचाऱ्यांना माझ्यापर्यंत पोहोचायला अर्धा ते एक तास लागला.