पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan) यांच्या जीवाला तुरुंगात (Jail) धोका असल्याचे त्यांची पत्नी बुशरा बीबी (Bushra Bibi) यांनी म्हटले आहे. तसेच, इम्रान खान यांच्यासाठी तुरुंगात चांगल्या सुविधा देण्याची मागणी बुशरा बीबी यांनी केली आहे. इम्रान खान सध्या अटक तुरुंगात आहेत.
इम्रान खान यांच्या पत्नीने पंजाबच्या गृह सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना इम्रान खान यांना पंजाबमधील अटक तुरुंगातून रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात हलवण्याचे निर्देश दिले आहेत. पण इम्रान खान यांना कोणतेही कारण न देता अटक तुरुंगात टाकण्यात आले आहे. कायद्यानुसार इम्रान खान यांना अदियाला कारागृहात हलवण्यात यावे."
जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, इम्रान खान यांना त्यांची सामाजिक आणि राजकीय स्थिती पाहता त्यांना 'बी' श्रेणीतील सुविधा देण्याची मागणी बुशरा बीबी यांनी केली होती. तसेच, बुशरा बीबी म्हणाल्या की, "अटक तुरुंगात इम्रान खान यांना विष दिले जाऊ शकते. इम्रान खान यांच्या हत्येचे दोन वेळा प्रयत्न झाले, मात्र यामध्ये सहभागी असलेल्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यांच्या जीवाला अजूनही धोका असून अटक तुरुंगात त्यांना विष प्राशन केले जाण्याची भीती आहे."
या महिन्याच्या सुरुवातीला बुशरा बीबी यांनी इम्रान खान यांची जवळपास ३० मिनिटे भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी सांगितले होते की, त्यांना त्रासदायक स्थितीत ठेवण्यात आले असून त्यांना 'सी श्रेणीतील तुरुंगात सुविधा' दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे, इम्रान खान यांना लाहोरमधील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. त्याआधी इस्लामाबादच्या न्यायालयाने तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना दोषी ठरवले होते. ते ५ ऑगस्टपासून तुरुंगात आहेत. सरकारी भेटवस्तूंच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न लपवल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले होते.