तुम्ही मौल्यवान वस्तू, कार किंवा ट्रक यांची चोरी झाल्याचं ऐकलं असेल. पण कधी चोरांनी चक्क रणगाडा चोरून नेल्याचं ऐकलंय का? इस्राइलमध्ये चोरांनी सैन्याचा एक चिलखती रणगाडा चोरून नेला आहे. धक्कादायक भाग म्हणजे सैन्याच्या हद्दीतूनच चोरट्यांनी हा महाकाय रणगाडा पळवून नेला. मात्र त्याची कुणाला कानोकान खबर लागली नाही. पोलिसांनी सांगितले की, हा रणगाडा एलिकिम इंटरचेंजजवळ इस्राइली डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) प्रशिक्षण तळावर ठेवण्यात आला होता. हा परिसर सर्वसामान्य जनतेसाठी पूर्णपणे प्रतिबंधित आहे, तसेच कुणीही सहजपणे इथे प्रवेश करू शकत नाही. मात्र चोरटे तिथे घुसले. तसेच त्यांनी तिथून चक्क रणगाडा पळवून नेला. चोरट्यांनी सैन्याच्या तळावरूनच रणगाडा पळवल्याने अधिकारी अवाक् झाले. अखेरीस हा रणगाडा शहरापासून २० किमी दूर अंतरावर एका ठिकाणावरून जप्त करण्यात यश आले.
इस्राइली मीडियाच्या रिपोर्टनुसार हा मर्कवा २ रणगाडा होता. त्याचं वजन तब्बल ६५ टन एवढं होतं. हा रणगाडा गायब झाल्याची वार्ता पसरताच खळबळ उडाली. लष्कराच्या तळावरून रणगाडा चोरीला जाणं ही सामान्य बाब नव्हती. त्यामुळे संरक्षण मंत्रालयापर्यंत याची माहिती देण्यात आली. अनेक संस्थांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. अखेरीस हा रणगाडा एलिकिम येथे शेवटचा दिसला होता. पोलीस तिथे पोहोचले तेव्हा तो एका स्क्रॅप यार्डमध्ये उभा होता.
इस्राइलच्या लष्करी इतिहासामध्ये आतापर्यंत घडलेला हा अजब प्रकार आहे. एवढा वजनदार रणगाडा नेमका चोरीस कसा काय गेला, याचा शोध आता तपास यंत्रणांकडून घेतला जात आहे. एवढंच नाही तर हा टँक २० किमी दूरवर नेऊन सोडण्यात आला. मात्र पोलिसांना त्याची कानोकान खबर लागली नाही. ही अत्यंत चिंतेची बाब समजली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.
आतापर्यंतच्या तपासामधून सरकारविरोधात आंदोलन करण्यासाठी हा रणगाडा चोरण्यात आला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. याआधी इस्राइलमध्ये अशीच एक घटना घडली होती. तेव्हा आंदोलकांनी स्मारकावरून एक टँक पळवला होता. हा टँक ऐतिहासिक होता आणि १९७३ मधील योम किप्पूर युद्धात त्याचा वापर केला गेला होता.