मंगोलियातील एका आठ वर्षांच्या मुलाने चीनची झोप उडवली आहे. हे बालक चीनला एवढे सलत आहे की, कुठल्याही परिस्थितीत त्याला आपल्या कस्टडीत घेण्याची चीनची इच्छा आहे. हे बालकाचे वैशिष्ट्य म्हणजे, हे बालक तिबेटीन बोद्धांचे तिसरे सर्वात मोठे धर्मगुरू 10वे खलखा जेटसन धम्पा रिनपोछे यांचा पुनर्जन्म असल्याचे मानले जाते.
बौद्ध धर्माचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी स्वतः या मुलाला हा दर्जा दिला आहे. या मुलाचे नाव ए अल्तान्नार असे आहे. हा मुलगा आता दलाई लामा आणि पंचेन लामा यांच्या नंतर बौद्ध धर्माचा तिसरा सर्वात मोठा धर्मगुरू बनला आहे. महत्वाचे म्हणजे, बौद्ध धर्मात धर्मगुरूंच्या पुनर्जन्माचे विशेष महत्व असते. यातच, ए अल्तान्नारला तिबेटीयन धर्मगुरू म्हणून मान्यता देण्यासाठी हिमाचल प्रदेशात मोठ्या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे चीनचा आणखीनच तिळपापड झाला आहे.
हिमाचल प्रदेशातून चालते तिबेटचे निर्वासित सरकार -महत्वाचे म्हणजे, हिमाचल प्रदेशातच 87 वर्षीय दलाई लामा निर्वासनात आहेत. एवढेच नाही, तर तिबेटचे निर्वासित सरकारही येथूनच काम करते.
चीन सरकारनं जारी केला होता आदेश - चीन सरकारने 2007 मध्ये एक आदेश जारी केला होता. यात, केवळ कम्युनिस्ट पक्षालाच बौद्ध लामा निवडण्याचा आधिकार आहे. चीनबाहेरील कुणीही व्यक्ती अथवा समूह असे करू शकत नाही, असे म्हटले होते. यामुळे, दलाई लामांच्या या निर्णयाने संतप्त चीन आपल्या देशावर कठोर कारवाई करू शकतो, अशी भीती मंगोलियन लोकांना वाटत आहे.